घरक्रीडाभारताची पुन्हा घसरगुंडी!

भारताची पुन्हा घसरगुंडी!

Subscribe

ईशांतचे ५ बळी; न्यूझीलंड पहिला डाव ३४८

आघाडीच्या फळीतील फलंदाजांचे अपयश भारताला महागात पडण्याची चिन्हे आहेत. ट्रेंट बोल्टच्या भेदक मार्‍यामुळे न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीच्या दुसर्‍या डावात भारताची तिसर्‍या दिवसअखेर ४ बाद १४४ अशी अवस्था होती. ते अजूनही ३९ धावांनी पिछाडीवर होते. भारताचा पहिला डाव अवघ्या १६५ धावांत आटोपला, ज्याचे उत्तर देताना न्यूझीलंडने ३४८ धावांची मजल मारत पहिल्या डावात १८३ धावांची आघाडी मिळवली. भारताचे फलंदाज दुसर्‍या डावात आपल्या खेळात सुधारणा करतील अशी आशा होती. मात्र, सलामीवीर मयांक अगरवालचा अपवाद वगळता इतरांनी पुन्हा निराशाच केली.

भारताचे सलामीवीर मयांक आणि पृथ्वी शॉ यांनी दुसर्‍या डावाच्या सुरुवातीला संयमाने फलंदाजी केली. त्यामुळे भारताची ७ षटकांत बिनबाद २२ अशी धावसंख्या होती. मात्र, पुढच्या षटकात डावखुरा वेगवान गोलंदाज बोल्टने उसळी घेतलेला चेंडू टाकत पृथ्वीला माघारी पाठवत भारताला पहिला झटका दिला. पृथ्वीने ३० चेंडूत १४ धावा केल्या. पुढे मयांक आणि चेतेश्वर पुजाराने दुसर्‍या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी रचली. डावखुरा फिरकीपटू एजाज पटेल टाकत असलेल्या २७ व्या षटकात मयांकने एक चौकार आणि एक षटकार लगावला. तर एजाजच्या पुढच्या षटकात त्याने चौकार लगावत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे कसोटीतील चौथे अर्धशतक होते.

- Advertisement -

काही षटकांनंतर मात्र बोल्टने पुजाराचा ११ धावांवर त्रिफळा उडवत ही जोडी फोडली. तर ९९ चेंडूत ५८ धावा केल्यावर मयांकला टीम साऊथीने बाद केले. कर्णधार विराट कोहलीला न्यूझीलंड दौर्‍यात सूर गवसलेला नाही. या डावातही त्याला अवघ्या १९ धावा करता आल्या. त्याला बोल्टने यष्टीरक्षक बीजे वॉटलिंगकरवी झेलबाद केले. त्यामुळे भारताची ४ बाद ११४ अशी अवस्था झाली. यानंतर अजिंक्य रहाणे (६७ चेंडूत नाबाद २५) आणि हनुमा विहारी (७० चेंडूत नाबाद १५) यांनी सावधपणे फलंदाजी केल्याने न्यूझीलंडला आणखी विकेट मिळवता आल्या नाहीत. भारताची दिवसअखेर ४ बाद १४४ अशी धावसंख्या होती.

त्याआधी तिसर्‍या दिवशी ५ बाद २१६ वरुन पुढे खेळताना न्यूझीलंडने आपल्या पहिल्या डावात ३४८ धावा केल्या आणि १८३ धावांची आघाडी मिळवली. वॉटलिंग (१४), साऊथी (६) यांना फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. मात्र, पदार्पण करणारा कायेल जेमिसन (४४), कॉलिन डी ग्रँडहोम (४३) आणि बोल्ट (३८) यांनी झुंजार फलंदाजी करत न्यूझीलंडला साडेतीनशे धावांच्या जवळ पोहोचवले. भारताकडून ईशांत शर्माने चांगली गोलंदाजी करत ६८ धावांत ५ मोहरे टिपले. कसोटीच्या एका डावात ५ विकेट घेण्याची ही त्याची अकरावी वेळ होती.

- Advertisement -

संक्षिप्त धावफलक – भारत : १६५ आणि ४ बाद १४४ (मयांक ५८, रहाणे नाबाद २५, कोहली १९, विहारी नाबाद १५; बोल्ट ३/२७) वि. न्यूझीलंड : पहिला डाव ३४८ (विल्यमसन ८९, जेमिसन ४४, टेलर ४४, डी ग्रँडहोम ४३, बोल्ट ३८; ईशांत ५/६८, अश्विन ३/९९).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -