घरक्रीडापृथ्वीसोबत स्पर्धा नाही!

पृथ्वीसोबत स्पर्धा नाही!

Subscribe

सराव सामना आजपासून

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला २१ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. भारताचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा दुखापतीमुळे या मालिकेत खेळू शकणार नाही. त्याच्या जागी पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल या युवकांपैकी एकाला मयांक अगरवालसोबत सलामीची संधी मिळेल. गिलने नुकतेच भारत अ संघाचे प्रतिनिधित्व करताना न्यूझीलंड अ संघाविरुद्ध कसोटीत द्विशतक आणि शतक झळकावले होते. त्यामुळे त्याला सलामीच्या स्थानासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहे. मात्र, पृथ्वीला गिलपेक्षा जास्त अनुभव असल्याने त्याला न्यूझीलंडविरुद्ध संधी मिळाली पाहिजे, असे मत काही क्रिकेट समीक्षक व्यक्त करत आहेत. आम्ही मात्र या गोष्टीचा विचार करत नसून आमच्यात सलामीच्या जागेसाठी स्पर्धा नाही, असे विधान गिलने केले.

माझ्या आणि पृथ्वीच्या कारकिर्दीची एकाच वेळी सुरुवात झाली. मात्र, असे असले तरी आमच्यात संघातील जागेसाठी अजिबातच स्पर्धा नाही. आम्हाला दोघांनीही काही संधी मिळाल्या आहेत आणि आम्ही त्या संधीचा चांगला उपयोग केला आहे. आता आमच्यापैकी कोणाला खेळवायचे हा निर्णय संघ व्यवस्थापन घेईल. आमच्यात सलामीच्या जागेसाठी स्पर्धा नाही, असे गिलने सांगितले.

- Advertisement -

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल असे विचारले असता गिल म्हणाला, न्यूझीलंडचे गोलंदाज उसळी घेणारे चेंडू टाकत बर्‍याच विकेट मिळवतात. खासकरून निल वॅग्नरने मागील काही काळात अप्रतिम कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मागील कसोटी मालिकेत विकेट मिळत नसताना ते उसळी घेणार्‍या चेंडूंनी फलंदाजांना अडचणीत टाकण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे आम्हाला याचा विचार करुन सावधपणे फलंदाजी करावी लागेल.

सलामीला खेळणे नवीन नाही!

- Advertisement -

न्यूझीलंड अ संघाविरुद्ध शुभमन गिल पहिल्या कसोटीत मधल्या फळीत खेळला होता. मात्र, दुसर्‍या कसोटीत त्याला सलामीला येण्याची संधी मिळाली. कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून खेळणे खूप अवघड असले तरी या स्थानावर खेळणे माझ्यासाठी नवीन नाही, असे गिलने स्पष्ट केले. सलामीला खेळणे माझ्यासाठी नवीन नाही. तुम्ही जेव्हा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करता, तेव्हा दोन विकेट आधीच गेलेल्या असतात. त्यामुळे फलंदाज म्हणून तुमच्यावर वेगळ्या प्रकारचे दडपण असते. दुसरीकडे तुम्ही सलामीवीर म्हणून खेळता, तेव्हा तुमच्यावर वेगळी जबाबदारी असते. तुम्हाला इतर फलंदाजांसाठी पाया रचावा लागतो, जेणेकरून त्यांना धावा करणे सोपे होते, असे गिल म्हणाला.

भारत-न्यूझीलंड इलेव्हन सराव सामना आजपासून
भारत आणि न्यूझीलंड इलेव्हन यांच्यातील तीन दिवसीय सराव सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. या सामन्यात शुभमन गिल आणि पृथ्वी शॉच्या कामगिरीवर सर्वांची नजर असेल. न्यूझीलंडमध्ये फिरकीपटूंना फारशी मदत मिळत नसल्याने कसोटी मालिकेत रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जाडेजा यांच्यापैकी एकालाच संघात स्थान शक्यता आहे. जाडेजाला नुकत्याच झालेल्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत फारसा प्रभाव पाडता आला नाही. तर अश्विन या दोन्ही संघांचा भाग नव्हता. त्यामुळे हे दोघेही सराव सामन्यात विकेट मिळवण्यास उत्सुक असतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -