घरक्रीडाउगाचच कारणे देणार नाही !

उगाचच कारणे देणार नाही !

Subscribe

पाचव्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा ३५ धावांनी पराभव केला. या पराभवामुळे भारताने पाच सामन्यांची ही मालिका २-३ अशी गमावली. मे महिन्यात सुरू होणार्‍या विश्वचषकाआधीची ही अखेरची एकदिवसीय मालिका असल्याने या मालिकेला खूप महत्त्व दिले जात होते. आता ही मालिका गमावल्यामुळे भारतीय संघ विश्वचषकासाठी कितीसा सज्ज आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, या मालिकेत आमचे प्रमुख लक्ष्य हे राखीव खेळाडूंना संधी देण्याचे होते, असे भारताचा कर्णधार विराट कोहली सामन्यानंतर म्हणाला. तसेच राखीव खेळाडूंना संधी दिली म्हणून आमचा पराभव झाला असे कारण देणार नाही, असेही त्याने सांगितले.

आमच्या ड्रेसिंग रूममधील कोणताही सदस्य फार चिंतेत नाही. कारण आम्हाला अखेरच्या तीन सामन्यांमध्ये काय करायचे होते याची कल्पना होती. विश्वचषकाआधी ही अखेरची मालिका असल्याने आम्हाला राखीव खेळाडूंना सामने खेळण्याची संधी द्यायची होती. आम्हाला त्यांना दबावाच्या परिस्थितीत टाकून ते कसे खेळतात हे पाहायचे होते आणि तसे करण्याची संधी आम्हाला या तीन सामन्यानंतर मिळणार नव्हती. मात्र, या खेळाडूंना संधी दिली म्हणून आमचा पराभव झाला असे कारण मी देणार नाही. कारण भारतासाठी जे खेळाडू खेळतात, त्यांनी सर्वोत्तम दिलेच पाहिजे आणि चांगली कामगिरी केलीच पाहिजे, असे कोहली म्हणाला.

- Advertisement -

तसेच काही दिवसांत सुरू होणार्‍या आयपीएलमुळे विश्वचषकाआधी खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळेल का असे विचारले असता कोहली म्हणाला, आम्ही खेळाडूंना पुढील दोन महिने आयपीएलचा आनंद घ्या आणि त्यातील कामगिरीबाबत फार विचार करू नका, असे सांगितले आहे. तसेच आम्ही खेळाडूंना थकवा जाणवला तर तुमच्या फ्रेंचायझीच्या व्यवस्थापनाला तसे सांगा आणि भारतीय संघाच्या फिजिओशी संवाद साधत रहा, असे सांगितले आहे. आयपीएल महत्त्वाचे नाही असे मी म्हणणार नाही, पण खेळाडूंनी हुशारीने वागले पाहिजे. शेवटी कोणत्याही खेळाडूला दुखापतीमुळे विश्वचषकाला मुकायला आवडणार नाही.

कोणता संघ विश्वचषक जिंकेल सांगू शकत नाही – कोहली

विश्वचषकात एखाद्या संघाने जिंकण्यास सुरुवात केली की त्या संघाला थांबवणे खूप कठीण असते. मात्र, बाद फेरीत हुशारीने खेळ करणारा संघ त्या संघाला पराभूत करू शकतो. मला वाटत नाही कोणत्याही संघाला तुम्ही प्रमुख दावेदार म्हणू शकता. वेस्ट इंडिजने मागील मालिकेत ज्याप्रकारे प्रदर्शन केले, ते पाहता त्यांचा पराभव करणे अवघड जाऊ शकते. इंग्लंडचा संघ मजबूत आहे, ऑस्ट्रेलियाचा संघ संतुलित आहे, न्यूझीलंडचा संघही खूप चांगला आहे, पाकिस्तानचा संघ आपल्या दिवशी कोणाचाही पराभव करू शकतो, असे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यानंतर विराट कोहली म्हणाला. इंग्लंडमध्ये होणारा विश्वचषक जिंकण्याचे भारत आणि इंग्लंडला प्रबळ दावेदार मानले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -