घरक्रीडावर्ल्डकप अंतिम सामन्यात कोणीही हरले नाही

वर्ल्डकप अंतिम सामन्यात कोणीही हरले नाही

Subscribe

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात कोणताही संघ पराभूत झाला नाही, असे विधान न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने मंगळवारी केले. यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघांमध्ये विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी झाला. नियमित आणि सुपर ओव्हरमध्ये हा सामना बरोबरीत राहिल्यामुळे सर्वाधिक चौकार-षटकार लागवणार्‍या संघाला या सामन्याचा विजेता ठरवण्यात आले. त्यामुळे इंग्लंडने २६-१७ या फरकाने हा सामना जिंकत विश्वचषकावर पहिल्यांदा आपले नाव कोरले. आयसीसीच्या या नियमावर आजी-माजी क्रिकेटपटू आणि चाहते यांनी जोरदार टीका केली. मात्र, आता याबाबत चर्चा करून काहीच फायदा नाही, असे विल्यमसनला वाटते.

अंतिम सामना फारच उत्कृष्ट झाला. या सामन्याच्या शेवटी दोन्ही संघांमध्ये काहीच फरक नव्हता, कोणताही संघ या सामन्यात हरला नाही, पण एका संघाला जेतेपद मिळाले आणि एका संघाची निराशा झाली. कोणालाही वाटले नसेल की अंतिम सामन्याचा विजेता सर्वाधिक चौकार-षटकार मारणारा संघ होईल. जेव्हा दोन संघांमध्ये फरक करण्यासाठी दोन प्रयत्न (नियमित सामना आणि सुपर ओव्हर) केले जातात, पण तरीही त्यांच्यात काहीच फरक नसतो, त्यावेळी एखाद्या संघाला विजेता घोषित करण्यात आले तर दुसर्‍या संघाला नक्कीच दुःख होते.

- Advertisement -

आम्ही या संधीसाठी खूप मेहनत घेतली होती. त्यामुळे दुसर्‍या संघाइतकाच चांगला खेळ करूनही पराभव होणे हे निराशाजनक आहे. मात्र, आमच्या खेळाडूंनी केलेला खेळ कौतुकास्पद होता. परंतु, इंग्लंडलाही श्रेय द्यायला पाहिजे. त्यांनी या संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली, असे विल्यमसन म्हणाला.

न्यूझीलंडच्या खेळाडूंची कामगिरी अभिमानास्पद – व्हिट्टोरी

- Advertisement -

इंग्लंडने विश्वचषक पटकावला असला ती न्यूझीलंडच्या खेळाडूंनी या स्पर्धेत जी कामगिरी केली, त्याचा त्यांना अभिमान वाटला पाहिजे, असे न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हिट्टोरी म्हणाला. अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी अप्रतिम खेळ केला. एक संघ वरचढ होत असतानाच दुसरा संघ पुनरागमन करत होता. न्यूझीलंडचे खेळाडू हा सामना गमावल्यामुळे नक्कीच निराश असतील, पण त्यांना त्यांच्या कामगिरीचा अभिमान वाटला पाहिजे, असे व्हिट्टोरीने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -