French Open : राफेल नदालचा विक्रम कधीही मोडला जाणार नाही – मरे

नदाल हा 'क्ले कोर्ट'चा बादशाह मानला जातो.

rafael nadal
राफेल नदाल

राफेल नदालने यंदा विक्रमी १३ व्यांदा फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकावले. नदाल हा ‘क्ले कोर्ट’चा बादशाह मानला जातो. त्याने रविवारी झालेल्या फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात अव्वल सीडेड नोवाक जोकोविचचा ६-०, ६-२, ७-५ असा धुव्वा उडवला. या विजयासह त्याने रॉजर फेडररच्या सर्वाधिक जेतेपदांच्या (२०) विक्रमाशीही बरोबरी केली. त्यामुळे नदालने फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकल्यानंतर फेडररने त्याचे अभिनंदन केले होते. ‘नदालची ही कामगिरी खेळांमधील सर्वोत्कृष्ट कामगिरींपैकी एक आहे,’ असे फेडरर म्हणाला होता. आता ब्रिटनचा टेनिसपटू अँडी मरेनेही नदालचे कौतुक केले आहे.

२००५ मध्ये पहिल्यांदा जिंकलेली स्पर्धा 

नदालचे यश अविश्वसनीय आहे. त्याने फ्रेंच ओपनमध्ये जो विक्रम केला आहे, तो कधीही मोडला जाणार नाही. त्याला मागे टाकणे जवळपास अशक्यच आहे. पीट सॅम्प्रस हा टेनिस इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक मानला जातो. त्याने १४ ग्रँड स्लॅम जेतेपदे पटकावली होती. नदालने एकच ग्रँड स्लॅम स्पर्धा १३ वेळा जिंकली आहे. यावरूनच त्याची ही कामगिरी खास आहे हे कळते. त्याच्यासारखी कामगिरी कोणीही करू शकणार नाही, असे मरे म्हणाला. ३३ वर्षीय मरेला यंदाच्या फ्रेंच ओपनमध्ये पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतु, तो विजेत्या नदालचे कौतुक करायला विसरला नाही. नदालने २००५ मध्ये पहिल्यांदा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती. तर यंदा ही स्पर्धा जिंकण्याची सलग चौथी वेळ होती.