घरक्रीडाभारतीय संघातून वगळल्याची चिंता नाही!

भारतीय संघातून वगळल्याची चिंता नाही!

Subscribe

कुलदीप यादवचे विधान

चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवला नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या आणि सध्या सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले नाही. त्याला आणि दुसरा अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या जागी निवड समितीने राहुल चहर आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संधी देण्याचा निर्णय घेतला. मात्र, टी-२० संघातून वगळण्यात आल्याची कुलदीपला चिंता नाही. संघात स्थान न मिळाल्याचा माझ्या आत्मविश्वासावर परिमाण झालेला नाही, असे कुलदीप म्हणाला.
मी आतापर्यंत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे टी-२० संघातून वगळण्यात आल्याची मला चिंता नाही. मला विश्रांतीची गरज आहे असे निवडकर्त्यांना वाटले असावे. भारतीय संघाला टी-२० क्रिकेटमध्ये अजून यश मिळण्यासाठी बदल गरजेचे आहेत असे कदाचित त्यांचे मत असेल. मला त्यांच्या मताचा आदर आहे आणि मला कसलीही तक्रार नाही. आता टी-२० संघात नसल्यामुळे मला कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करता येईल, असे कुलदीप म्हणाला.

कसोटीत सातत्याने संधी मिळणे अवघड!
रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जाडेजा संघात असल्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने संधी मिळणे अवघड आहे, असे कुलदीपला वाटते. जेव्हा संघामध्ये अश्विन, जाडेजा आणि मी असे तीन फिरकीपटू असतात, तेव्हा संघ व्यवस्थापनापुढे कोणाला निवडायचे हा कठीण प्रश्न असतो. अश्विन आणि जाडेजासारखे उत्कृष्ट फिरकीपटू कसोटी संघात असल्यामुळे मला सातत्याने संधी मिळत नाहीत. त्यामुळे संधी मिळताच त्याचे सोने करण्यासाठी माझ्यावर दबाव असतो, असे कुलदीपने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -