French Open 2020 : जोकोविच अंतिम फेरीत; नदालसोबत जेतेपदासाठी लढत  

नदालने उपांत्य फेरीत स्टेफानोस त्सीत्सीपासवर मात केली.  

novak djokovic
नोवाक जोकोविच

सर्बियाचा स्टार खेळाडू नोवाक जोकोविचने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. त्याने पाच सेट रंगलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ग्रीसच्या स्टेफानोस त्सीत्सीपासवर मात केली. आता रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत जोकोविचसमोर स्पेनचा स्टार खेळाडू राफेल नदालचे आव्हान असणार आहे. नदालने विक्रमी १२ वेळा फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकावले असून जोकोविचला केवळ एकदाच ही स्पर्धा जिंकता आली आहे. त्यामुळे रविवारच्या सामन्यातही नदालचे पारडे जड मानले जात आहे. नदालने ही स्पर्धा जिंकल्यास तो रॉजर फेडररच्या सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपदांच्या (२०) विक्रमाशी बरोबरी करेल.

त्सीत्सीपासचे दमदार पुनरागमन

जोकोविच आता दुसऱ्यांदा फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकावण्याच्या प्रयत्नात असून त्याने पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत पाचव्या सीडेड त्सीत्सीपासचा ६-३, ६-२, ५-७, ४-६, ६-१ असा पराभव केला. या सामन्यात जोकोविचने पहिले दोन सेट अगदी सहजपणे जिंकले. तिसरा सेटही जिंकण्याची जोकोविचला संधी होती. मात्र, त्सीत्सीपासने दमदार पुनरागमन करत हा सेट ७-५ आणि पुढचा सेट ६-४ असा जिंकत सामन्यात २-२ अशी बरोबरी केली. पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये मात्र जोकोविचने त्सीत्सीपासची सर्विस दोनदा मोडत ४-१ अशी आघाडी मिळवली. यानंतर त्सीत्सीपासला पुनरागमन करता आले नाही. जोकोविचने हा सेट ६-१ असा मोठ्या फरकाने जिंकत अंतिम फेरी गाठली.