IPL 2020 : ‘ती’ खेळी केवळ डिव्हिलियर्सच करू शकत होता – कोहली

कोलकाताविरुद्ध डिव्हिलियर्सने ३३ चेंडूत नाबाद ७३ धावांची खेळी केली.

एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली 

शारजाची खेळपट्टी ही फलंदाजीला अनुकूल मानली जाते. या मैदानावर आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांत सर्वच संघ २०० हून अधिकची धावसंख्या करत असल्याचे पाहायला मिळाले होते. परंतु, हळूहळू ही खेळपट्टी संथ होत चालल्याने गेल्या एक-दोन सामन्यांत संघांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले होते. मात्र, असे असतानाही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना २ बाद १९४ अशी धावसंख्या उभारली. आम्हाला मोठी धावसंख्या उभारणे केवळ एका खेळाडूमुळे शक्य झाल्याचे सामन्यानंतर बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली म्हणाला.

एबीची ही खेळी अविश्वसनीय

खेळपट्टी थोडी संथ वाटत होती. मात्र, हवा चांगली असल्याने आम्हाला वाटले की, दुसऱ्या डावात दव पडणार नाही आणि गोलंदाजांना अडचण येणार नाही. त्यामुळेच आम्ही प्रथम फलंदाजी स्वीकारली. केवळ एक ‘सुपरह्युमन’ वगळता, प्रत्येक फलंदाजाला त्या खेळपट्टीवर धावा करणे अवघड गेले. आम्ही प्रथम फलंदाजी करताना १६५ पर्यंत धावसंख्या उभारण्याचा विचार करत होतो, पण अखेर आम्ही १९४ धावा केल्या. यामागचे कारण सर्वांनाच माहित आहे. एबी डिव्हिलियर्स. तो फलंदाजीला आला आणि तिसऱ्याच चेंडूवर अप्रतिम फटका मारला. इतर सामन्यांत काही फलंदाजांनी उत्कृष्ट खेळी केल्या आहेत. मात्र, या खेळपट्टीवर, ती खेळी केवळ एकच खेळाडू करू शकत होता. एबीची ही खेळी अविश्वसनीय होती, असे कोहली म्हणाला. कोलकाताविरुद्ध डिव्हिलियर्सने ३३ चेंडूत नाबाद ७३ धावांची खेळी केली.