घरक्रीडाऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘या’ खेळाडूंना मिळू शकेल संधी !

ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘या’ खेळाडूंना मिळू शकेल संधी !

Subscribe

आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी शुक्रवारी भारतीय संघाची निवड होणार आहे. या मालिकेला विशेष महत्त्व आहे. कारण, मे महिन्यात सुरू होणार्‍या विश्वचषकाआधी भारताचे हे शेवटचे आंतरराष्ट्रीय सामने असणार आहेत. यानंतर खेळाडूंना सरावाची संधी फक्त आयपीएलमध्ये मिळणार आहे. त्यामुळे विश्वचषक डोळ्यासमोर ठेवत या मालिकेत निवड समिती काही राखीव खेळाडूंना संधी देण्याची शक्यता आहे. जेणेकरून कोणत्याही प्रमुख खेळाडूला दुखापत झाली, तर हे खेळाडू विश्वचषकामध्ये भारतीय संघाच्या उपयोगी पडू शकतील. कोण असू शकतील हे खेळाडू जाणून घेऊया.

रिषभ पंत –
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतला भारतीय संघात स्थान मिळणार हे जवळपास निश्चित आहे. रिषभ पंतने मागील वर्षी एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये शतके केली. मात्र, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याला फारसे यश लाभलेले नाही. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या मालिकेतील तीन सामन्यांत त्याला २०.५० च्या सरासरीने ४१ धावाच करता आल्या होत्या. त्यातच अंबाती रायडू, दिनेश कार्तिक आणि महेंद्रसिंग धोनी यांनी आपल्या प्रदर्शनात सुधारणा केल्यामुळे पंतला या मालिकेनंतर पुन्हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये संधी मिळालेली नाही.

- Advertisement -

लोकेश राहुल –
लोकेश राहुल मागील काही महिन्यांत मैदानापेक्षा मैदानाबाहेरील गोष्टींमुळे चर्चेत आहे. त्याने एका कार्यक्रमात महिलांबाबत आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यामुळे त्याच्यावर बंदीही घालण्यात आली होती. त्याआधी त्याला मैदानात काही विशेष कामगिरी करता आली नव्हती. राहुलला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगले प्रदर्शन करण्यात अपयश आले होते. एका सामन्यासाठी त्याला संघातून वगळण्यातही आले होते. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये राहुलने आतापर्यंत १३ सामन्यांच्या १२ डावांत ३५ च्या सरासरीने ३१७ धावा केल्या आहेत. त्यातही सहावेळा तो एकेरी धावसंख्या करून बाद झाला आहे. मागील वर्षी तो ३ सामने खेळला. त्यापैकी एका सामन्यात त्याने ६० तर इतर २ सामन्यांत मिळून ९ धावा केल्या होत्या. मात्र, असे असले तरी तो विश्वचषकाच्या संघासाठी राखीव सलामीविराचा पर्याय मानला जात आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्माला विश्रांती देऊन राहुलला संधी मिळण्याची शक्यता आहे.

अजिंक्य रहाणे –
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आणि सर्वात महत्त्वाच्या फलंदाजांपैकी एक अजिंक्य रहाणेने मागील आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना फेब्रुवारी २०१८ मध्ये खेळला आहे. त्याला मागील ४ सामन्यांमध्ये ६१ धावाच करता आल्या होत्या. त्यातच त्याच्यावर त्याच्या कमी स्ट्राईक रेटमुळेही वारंवार टीका झाली आहे. त्यामुळे त्याला एकदिवसीय संघातून वगळण्यात आले होते. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या मागील भारत दौर्‍याच्या ५ एकदिवसीय सामन्यांपैकी ४ सामन्यांत रहाणेने अर्धशतके केली होती, तसेच यावर्षी त्याने भारत ‘अ’ कडून खेळताना ३ एकदिवसीय सामन्यांत २ अर्धशतके केली आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने रोहितसोबतच शिखर धवनलाही विश्रांती देण्याचा निर्णय घेतला, तर रहाणेची सलामीवीर म्हणून संघात निवड होऊ शकेल.

- Advertisement -

कृणाल पांड्या –
विश्वचषकाच्या संघात फिरकीपटू म्हणून कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांचे संघातील स्थान निश्चित आहे. मात्र, तिसरा फिरकीपटू कोण असणार हा अजूनही प्रश्न आहे. तिसरा फिरकीपटू म्हणून रविंद्र जाडेजाला पसंती मिळेल, असा अंदाज असला तरी त्याला कृणाल पांड्या टक्कर देऊ शकेल. हार्दिक पांड्याचा भाऊ म्हणून ओळखल्या जाणार्‍या कृणाल पांड्याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना चांगली कामगिरी करत स्वतःची ओळख निर्माण केली. या स्पर्धेत तसेच स्थानिक क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन केल्यामुळे त्याची भारतीय टी-२० संघातही निवड झाली. कृणालने भारताकडून ९ टी-२० सामन्यांत १० विकेट घेतल्या आहेत, तर १५७ च्या स्ट्राईक रेटने ६१ धावा केल्या आहेत. मात्र, त्याला अजून एकदिवसीय संघात संधी मिळालेली नाही. त्याने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत संघ दबावात असताना चांगला खेळ केला होता. त्यामुळे तो एकदिवसीय क्रिकेटमध्येही अशी कामगिरी करू शकेल का हे पाहण्यासाठी निवड समिती त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत संधी देऊ शकेल.

उमेश यादव –
उमेश यादव भारतीय कसोटी संघाचा सातत्याने भाग आहे, पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये चित्र जरा वेगळे आहे. उमेशने मागील वर्षी अवघे ४ एकदिवसीय सामने खेळले होते. यापैकी प्रत्येक सामन्यात त्याने ६० पेक्षा अधिक धावा दिल्या होत्या, तर त्याला चारच विकेट मिळवण्यात यश आले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी त्याला संघात स्थान मिळाले नव्हते. मात्र, त्याने याचा फायदा घेत रणजीमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आणि रणजीच्या ३ सामन्यांच्या ६ डावांत त्याने २३ विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे सध्या तो चांगल्या फॉर्मात आहे, तसेच इंग्लंडमधील वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्ट्यांवर त्याच्या वेगाचा भारताला फायदा होऊ शकेल. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका संपताच काही दिवसांत आयपीएल सुरू होणार असल्याने भारत वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीला काही सामन्यांसाठी विश्रांती देण्याच्या विचारात असतील. त्यामुळे या मालिकेसाठी शार्दूल ठाकूरचे संघात पुनरागमन होऊ शकेल, तसेच ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध साधारण कामगिरी करणार्‍या युवा खलील अहमद आणि मोहम्मद सिराज यांनाही या मालिकेत आपली चमक दाखवण्याची संधी मिळू शकेल, तसेच जसप्रीत बुमराहचेही संघात पुनरागमन होणार हे निश्चित आहे. याशिवाय शुभमन गिलचा पुन्हा संघात समावेश होतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील २ सामन्यांच्या टी-२० मालिकेला २४ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. हे सामने अनुक्रमे विशाखापट्टणम आणि बंगळुरु येथे होतील, तर पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका २ मार्चपासून सुरू होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -