IPL 2020 : गोलंदाजांच्या मेहनतीवर फलंदाजांनी पाणी फेरले – धोनी

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा संघ पराभूत झाला.

महेंद्रसिंग धोनी

आमच्या गोलंदाजांनी बरीच मेहनत घेत कोलकाताला कमी धावसंख्येवर रोखले. परंतु, त्यांच्या मेहनतीवर आमच्या फलंदाजांनी पाणी फेरले, अशा शब्दांत चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने फलंदाजांवर टीका केली. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा संघ पराभूत झाला. या सामन्यात कोलकाताने चांगली सुरुवात केली होती. मात्र, चेन्नईच्या गोलंदाजांनी त्यांना १६७ धावांवर रोखले. याचा पाठलाग करताना सलामीवीर शेन वॉटसनने सलग दुसरे अर्धशतक झळकावले, पण त्याला इतर फलंदाजांची फारशी साथ मिळाली नाही. त्यामुळे चेन्नईला २० षटकांत १५७ धावाच करता आल्या आणि त्यांनी हा सामना १० धावांनी गमावला.

हे लक्ष्य गाठले पाहिजे होते

मधल्या षटकांमध्ये कोलकाताच्या गोलंदाजांनी तीन-चार चांगली षटके टाकली. त्यानंतर आम्ही दोन-तीन विकेट झटपट गमावल्या. आम्ही त्या षटकांमध्ये जरा वेगळ्या पद्धतीने फलंदाजी केली असती आणि विकेट घालवल्या नसत्या, तर सामन्याचा निकाल कदाचित वेगळा लागला असता. गोलंदाजीत सुरुवातीच्या काही षटकांमध्ये आम्ही खूप धावा खर्ची केल्या. परंतु, करण शर्माने उत्तम गोलंदाजी केली. आमच्या गोलंदाजांनी चांगले पुनरागमन करत कोलकाताला १६० धावांपर्यंत रोखले. फलंदाजीत आम्ही हे लक्ष्य गाठले पाहिजे होते. परंतु, आमच्या गोलंदाजांच्या मेहनतीवर फलंदाजांनी पाणी फेरले, असे धोनी म्हणाला.

पाच षटकांत १६ धावा

धोनी या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. परंतु, तो केवळ ११ धावा करू शकला. तसेच पाचव्या क्रमांकावर आलेला केदार जाधव १२ चेंडूत केवळ ७ धावाच करू शकला. या दोघांनी केलेल्या संथ फलंदाजीचा फटका चेन्नईला बसला. चेन्नईने ११ ते १५ या पाच षटकांत केवळ १६ धावा केल्या. त्यामुळे दोघांवर बरीच टीकाही झाली.