पी. व्ही. सिंधू जगज्जेती! अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत विजय!

Mumbai
p v sindhu
सिंधू

स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेल्या जगतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताच्या पी. व्ही. सिंधून सुरेख कामगिरी करत जगज्जेतेपदाला गवसणी घातली आहे. जपानच्या नोझोमी ओकुहाराला नमवत पी. व्ही. सिंधूने जागतिक अजिंक्यपदाचं सुवर्णपदक आपल्या नावावर केलं. असा विक्रम करणारी सिंधू पहिली भारतीय बॅडमिंटन खेळाडू ठरली आहे. याआधीही दोनदा सिंधू जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. मात्र, हे यश जगज्जेतेपदामध्ये परावर्तित करण्यात तिला अपयश आलं होतं. यंदा मात्र, तिने ही किमया साधली आहे. या सुवर्णपदकामुळे आता सिंधूच्या नावावर या स्पर्धेत एकूण एक सुवर्णपदक, दौन रौप्य पदकं आणि दौन कांस्य पदकं झाली आहेत.

कशी जिंकली सिंधू?

तणावाखाली असताना सिंधूला तिच्या पात्रतेला साजेसा खेळ करता येत नाही हे सर्वश्रुत होतं. मात्र, आपल्या याच प्रतिमेला छेद देत सिंधूने आज जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. याआधी कोणत्याही भारतीय खेळाडूला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये विजय मिळवता आलेला नव्हता. वास्तविक सिंधू आणि ओकुहारा यांच्यात तुलना केल्यास, सिंधूचंच पारडं जड होतं. मात्र, अंतिम फेरीमधला याआधी दोनदा झालेला पराभव आणि अंतिम सामन्याचं दडपण यामुळे तिच्या चाहत्यांना आणि तमाम भारतीयांना धाकधूक वाटत होती. मात्र, सिंधूने हे सर्व अंदाज मोडीत काढत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. पहिल्या गेमपासूनच आक्रमक खेळ करणाऱ्या सिंधूनं ओकुहाराला चारीमुंड्या चित केलं. सिंधूनं विजेयी फटका मारताच स्वित्झर्लंडच्या स्टेडिअममध्ये देखील ‘गणपती बाप्पा मोरया’ आणि ‘वंदे मातरम्’चा गजर झाला. फक्त सिंधूने ओकुहाराला २१-७, २१-७ असं सरळ सेटमध्ये पराभूत केलं. आणि तेही फक्त ३६ मिनिटांच्या खेळामध्ये!