पाकिस्तानचा स्टार फुटबॉलपटू आफ्रिदीची गोळ्या घालून हत्या

पाकिस्तानचा फुटबॉलपटू जुनैद आफ्रिदी याची हत्या झाल्याने क्रीडा क्षेत्रात खळबळ

प्रातिनिधीक फोटो

दोन गटात झालेल्या वादात पाकिस्तानच्या स्टार खेळाडूचा मृत्यू झाला आहे. यात पाकिस्तानच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा खेळाडू जुनैद आफ्रिदी याचा मृत्यू झाला. फुटबॉल सामना सुरू असतानाच त्याला गोळ्या घालण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानचा फुटबॉलपटू जुनैद आफ्रिदी याची हत्या झाल्याने क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना पाकिस्तानमधील खैबर जिल्ह्यातील जमरूद भागात घडली आहे.

पाकिस्तानमधील प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, फुटबॉल सामना सुरू असताना दोन गटात जमिनीच्या वादातून गोळीबार झाला. यादरम्यान जुनैद आफ्रिदी याला गोळी लागली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. गोळीबारात अन्य एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. मात्र गोळीबाराच्या घटनेत एका स्टार खेळाडूचा मृत्यू झाल्याने चाहत्यांनी दुःख व्यक्त केले आहे.

जुनैद केपी सर्कलमधील स्टार फुटबॉलपटू होता. यंग जमरूद फुटबॉल क्लबकडून तो खेळला होता. फुटबॉल सामना पाहत असताना जुनैदच्या भावाचा काही लोकांशी वाद सुरू झाला. काही दिवसांपूर्वी त्याच्या भावाला लुटलं होत. त्यातून पुन्हा एकदा वाद झाला असून ही धक्कादायक घटना घडली असे पाकिस्तान फुटबॉलने ट्विट केले आहे.


गांजा मारून उंदीर झाला टल्ली; मालक बुचकळ्यात, नक्की पानं कुणी खाल्ली!