घरक्रीडावन-डे संघात पंत, राहुल इन; कार्तिक, जाडेजा आऊट

वन-डे संघात पंत, राहुल इन; कार्तिक, जाडेजा आऊट

Subscribe

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी मयांक मार्कंडेची निवड

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची शुक्रवारी घोषणा झाली. टी-२० मालिकेसाठी युवा लेगस्पिनर मयांक मार्कंडे आणि उमेश यादवची संघात निवड झाली आहे, तर एकदिवसीय संघात अपेक्षेनुसार सलामीवीर लोकेश राहुल आणि यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतचे पुनरागमन झाले आहे. दिनेश कार्तिकला टी-२० संघात स्थान मिळाले असले तरी त्याला एकदिवसीय संघातून वगळण्यात आले आहे. युवा वेगवान गोलंदाज खलील अहमद आणि रविंद्र जाडेजा यांना दोन्ही मालिकांसाठी संघात स्थान मिळालेले नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धचे सामने हे मे महिन्यात सुरू होणार्‍या विश्वचषकाआधीचे शेवटचे आंतरराष्ट्रीय सामने असल्याने या मालिकांसाठी भारतीय संघात कोणाची निवड होणार याकडे सार्‍यांचे लक्ष होते.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघात कर्णधार विराट कोहलीचे पुनरागमन झाले आहे. कोहलीला न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या २ एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. त्याच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करणार्‍या रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्रांती मिळेल असा अंदाज वर्तवला जात होता, मात्र रोहितची दोन्ही संघांत निवड झाली आहे, तसेच लोकेश राहुलची राखीव सलामीवीर संघात निवड झाली आहे. राहुलची ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या एकदिवसीय मालिकेसाठी संघात निवड झाली होती, मात्र एका कार्यक्रमात महिलांबाबत आक्षेपार्ह विधाने केल्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले होते. आता त्याला पुन्हा एकदा विश्वचषकाआधी आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळणार आहे, तसेच यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतलाही दोन्ही संघांमध्ये स्थान मिळाले आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचेही संघात पुनरागमन झाले आहे.

- Advertisement -

अनुभवी दिनेश कार्तिकला मात्र एकदिवसीय संघातून वगळण्यात आले आहे. कार्तिकला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ एकदिवसीय सामन्यांत ३७ तर न्यूझीलंडविरुद्धच्या २ सामन्यांमध्ये ३८ धावाच करता आल्या होत्या. कार्तिकप्रमाणेच ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौर्‍यात भारतीय संघात स्थान मिळालेल्या रविंद्र जाडेजा, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज यांना संघातून वगळण्यात आले आहे, तर न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्‍या शुभमन गिललाही दोन्ही संघात स्थान मिळालेले नाही. त्यामुळे या खेळाडूंना विश्वचषकासाठी भारतीय संघात पुनरागमन करायचे असेल तर त्यांना आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करावी लागणार आहे.

टी-२० मालिकेसाठी कुलदीप यादवला विश्रांती देण्यात आली आहे, तर युवा लेगस्पिनर मयांक मार्कंडेला संघात स्थान मिळाले आहे. मार्कंडेने मागील वर्षी मुंबई इंडियन्सकडून खेळताना आयपीएलमध्ये अप्रतिम प्रदर्शन केले होते. त्याने आतापर्यंत १८ टी-२० सामन्यांत २० विकेट घेतल्या आहेत.

- Advertisement -

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील २ सामन्यांच्या टी-२० मालिकेला २४ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. हे सामने अनुक्रमे विशाखापट्टणम आणि बंगळुरु येथे होतील, तर पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका २ मार्चपासून सुरू होईल.

भारतीय संघ :

टी-२० मालिकेसाठी – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, विजय शंकर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, सिद्धार्थ कौल, मयांक मार्कंडे.

एकदिवसीय मालिकेसाठी – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायडू, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, विजय शंकर, रिषभ पंत, लोकेश राहुल, सिद्धार्थ कौल (पहिले २ सामने), भुवनेश्वर कुमार (अखेरचे ३ सामने).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -