घरक्रीडाशस्त्रक्रियेनंतर कसोटी क्रिकेट खेळणे मोठे आव्हान - हार्दिक

शस्त्रक्रियेनंतर कसोटी क्रिकेट खेळणे मोठे आव्हान – हार्दिक

Subscribe

भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्याला दुखापतीमुळे काही काळ मैदानाबाहेर राहावे लागले. मागील वर्षी हार्दिकच्या पाठीला दुखापत झाल्याने त्यावर शस्त्रक्रिया करणे भाग पडले. हार्दिक हा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत भारताचा प्रमुख अष्टपैलू आहे. परंतु, पाठीवर शस्त्रक्रिया झाल्यामुळे आता तो केवळ एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याचा विचार करत असून कसोटी क्रिकेट खेळणे त्याला आव्हान वाटत आहे. त्याने आतापर्यंत ११ कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व केले असून यापैकी अखेरचा सामना तो सप्टेंबर २०१८ मध्ये खेळला होता.

मी अष्टपैलू आहे. मी स्वतःकडे राखीव वेगवान गोलंदाज म्हणूनही पाहतो. परंतु, पाठीवर शास्त्रकिया झाल्यानंतर आता कसोटी क्रिकेट खेळणे मला मोठे आव्हान वाटत आहे. मला केवळ कसोटी क्रिकेटमध्येच संधी मिळत असती आणि मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळता येत नसते, तर मी आताही कसोटीत खेळण्याचा धोका पत्करला असता. मात्र, एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये माझे महत्त्व मला माहीत आहे. कसोटी क्रिकेट खेळल्यानंतर मी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली नाही असे बरेचदा झाले आहे. कारण कसोटीत शरीरावर खूप ताण पडतो आणि थकवा जाणवतो. त्यामुळे अपेक्षित कामगिरी करण्यासाठी माझ्यात ऊर्जाच राहत नाही, असे हार्दिक म्हणाला.

- Advertisement -

२०१८ सालच्या आशिया चषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हार्दिकच्या पाठीला पहिल्यांदा दुखापत झाली. त्यानंतर कारकीर्द संपल्याची भीती त्याला वाटली होती. अगदी खरे सांगायचे तर त्यावेळी माझी कारकीर्द संपली अशी भीती मला वाटली. कारण क्रिकेटमध्ये कोणत्याही खेळाडूला मी स्ट्रेचरवरून नेताना पाहिलेले नाही. १० मिनिटे माझी शुद्धच हरपली होती आणि त्यानंतरही दुखणे कमी झाले नाही. आशिया चषकानंतर मला विश्रांती मिळणार होती. परंतु, त्याआधीच मला दुखापत झाली, असे हार्दिकने सांगितले.

‘त्या’ प्रकरणातून खूप शिकलो!
मागील वर्षी एका टीव्हीवरील कार्यक्रमात हार्दिकने महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती. त्यामुळे त्याच्यावर बरीच टीकाही झाली. त्या प्रकरणाविषयी हार्दिक म्हणाला, मी त्या प्रकरणातून खूप शिकलो. मी आयुष्यात बर्‍याच चुका केल्या आहेत; पण चांगली बाब म्हणजे मी चुका मान्य करतो. मी माझी चूक मान्य केली नसती, तर कदाचित पुन्हा एखाद्या टीव्ही कार्यक्रमात तसाच प्रकार घडला असता. तो काळ माझ्यासाठी अवघड होता. मात्र, आता मला त्याने फारसा फरक पडत नाही. कारण आम्ही कुटुंब म्हणून ते प्रकरण स्वीकारले. परंतु, माझ्या कृतीमुळे कुटुंबाला त्रास सहन करावा लागल्याचे दुःख आहे, असे हार्दिकने नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -