पोलार्ड विंडीजचा नवा कर्णधार?

Mumbai
पोलार्ड

इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकातील खराब कामगिरी आणि त्यानंतर झालेल्या भारताविरुद्धच्या मालिकेत (टी-२०, एकदिवसीय आणि टी-२० मिळून) एकही सामना जिंकण्यात अपयश आल्यामुळे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड मर्यादित षटकांच्या संघासाठी नवा कर्णधार नियुक्त करण्याच्या तयारीत आहे. जेसन होल्डर आणि कार्लोस ब्रेथवेट यांना विंडीजच्या अनुक्रमे एकदिवसीय आणि टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात येणार आहे. या दोन्ही संघांच्या कर्णधारपदी अनुभवी किरॉन पोलार्डची निवड करण्यासाठी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड उत्सुक आहे.

वेस्ट इंडिजमधील स्थानिक वृत्तपत्राच्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाच्या संचालकांच्या तिमाही बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. विंडीजच्या निवड समितीने नवा कर्णधार म्हणून पोलार्डचे नाव सुचवले. यानंतर सर्व संचालकांची मते घेण्यात आली. पोलार्डची कर्णधारपदी निवड होण्याला सहा संचालकांनी पाठिंबा दर्शवला आणि सहा संचालकांनी मते नोंदवली नाहीत.

३२ वर्षीय पोलार्ड २०१६ नंतर विंडीजकडून एकदिवसीय क्रिकेट खेळलेला नाही. २०१९ विश्वचषकासाठी त्याची राखीव खेळाडूंमध्ये निवड झाली होती. मात्र, त्यानंतर झालेल्या भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेत तो खेळला होता. पोलार्डने आतापर्यंत १०१ एकदिवसीय सामन्यांत विंडीजने प्रतिनिधित्व केले असून त्यात त्याने २२८९ धावा केल्या आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये त्याने विंडीजकडून ६२ सामने खेळले आहेत आणि त्यात ९०३ धावा केल्या आहेत. पोलार्ड सध्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये त्रिनिदाद संघाचे नेतृत्व करत आहे.