Nations League : पोर्तुगाल, बेल्जियम विजयी; इंग्लंडचा संघ पराभूत

पोर्तुगालने स्वीडनवर ३-० अशी मात केली.  

पोर्तुगाल फुटबॉल संघ 

पोर्तुगाल, बेल्जियम या संघांना युएफा नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील आपापले सामने जिंकण्यात यश आले. इंग्लंडच्या संघाला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना डेन्मार्कने ०-१ असे पराभूत केले. पोर्तुगालने त्यांचा दमदार खेळ सुरु ठेवत स्वीडनवर ३-० अशी मात केली. या सामन्यात पोर्तुगालचा कर्णधार आणि त्यांच्याकडून सर्वाधिक गोल करणारा खेळाडू क्रिस्तिआनो रोनाल्डो खेळू शकला नाही. मंगळवारीच रोनाल्डोला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळले होते. त्यामुळे त्याने इटलीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तो इटालियन संघ ज्युव्हेंटसकडून व्यावसायिक फुटबॉल खेळतो. इटलीत रोनाल्डोला किमान दहा दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे.

दिएगो जोटाचे दोन गोल

स्वीडनविरुद्धच्या सामन्याची पोर्तुगालने आक्रमक सुरुवात केली. २१ व्या मिनिटाला बर्नार्डो सिल्वा, तर ४४ व्या मिनिटाला दिएगो जोटाने केलेल्या गोलमुळे या सामन्याच्या मध्यंतराला पोर्तुगालकडे २-० अशी आघाडी होती. उत्तरार्धातही पोर्तुगालने त्यांचा दमदार खेळ सुरु ठेवला. अखेर ७२ व्या मिनिटाला जोटाने त्याचा दुसरा आणि पोर्तुगालचा तिसरा गोल केला. त्यामुळे पोर्तुगालने हा सामना ३-० असा जिंकला. दुसरीकडे बेल्जियमने आइसलँडचा २-१ असा पराभव केला. बेल्जियमचे दोन्ही गोल स्टार स्ट्रायकर रोमेलू लुकाकूने केले. लुकाकूनेच या सामन्यात बेल्जियमचे कर्णधारपद भूषवले. बेल्जियमचा हा चार सामन्यांत तिसरा विजय होता.

डेन्मार्ककडून इंग्लंडचा पराभव 

इंग्लंडच्या संघाला डेन्मार्कने ०-१ असे पराभूत केले. या सामन्यात इंग्लंडचे दोन खेळाडू हॅरी मग्वायर आणि रीस जेम्स यांना रेड कार्ड मिळाले. मग्वायरला ३१ व्या मिनिटालाच रेड कार्ड मिळाले आणि याचा फटका इंग्लंडला बसला. ३५ व्या मिनिटाला डेन्मार्कला पेनल्टी मिळाली. यावर क्रिस्टियन एरिक्सनने गोल करत डेन्मार्कला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर डेन्मार्कचा भक्कम बचाव न भेदता आल्याने इंग्लंडने सामना ०-१ असा गमावला.