घरक्रीडापृथ्वीने नैसर्गिक खेळचं करावा - विनोद कांबळी

पृथ्वीने नैसर्गिक खेळचं करावा – विनोद कांबळी

Subscribe

पृथ्वी कोणत्याही देशात खेळला तरी आक्रमकच खेळेल आणि खूप धावा करेल अशी अपेक्षा विनोद कांबळीला आहे.

भारतीय क्रिकेट संघ कसोटी क्रिकेटमध्ये भारतात चांगले प्रदर्शन करत असला तरी परदेशात त्यांना चांगला खेळ करता आलेला नाही. द.आफ्रिका आणि इंग्लंड या मागील दोन परदेश दौऱ्यांत भारताला कसोटी मालिका जिंकण्यात अपयश आले. असे असले तरीही पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेत भारत विजयी होईल असे मत भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळीने व्यक्त केले आहे.

वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथच्या अनुपस्थितीचा फायदा भारत घेईल

भारताच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेबद्दल कांबळी म्हणाला, “भारताला ही मालिका जिंकायची खूप चांगली संधी आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघात त्यांचे दोन प्रमुख फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ नाहीत. याचा फायदा भारताने घ्यायला हवा. मला वाटते की त्यांच्या अनुपस्थितीचा फायदा भारत घेईल आणि ही कसोटी मालिका जिंकेल.” स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर द.आफ्रिकेविरुद्ध बॉल टॅम्परिंग केल्यामुळे बंदी घालण्यात आली आहे.

पृथ्वी एक आक्रमक फलंदाज

या मालिकेत भारताचा युवा सलामीवीर मुंबईकर पृथ्वी शॉ आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदा परदेशात खेळणार आहे. पृथ्वीने मागील महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने पहिल्याच सामन्यात आक्रमक शतक झळकावले होते. कांबळीला पृथ्वीकडून अशाच खेळाची अपेक्षा ऑस्ट्रेलियातही आहे. “पृथ्वी एक आक्रमक फलंदाज आहे. त्यामुळे त्याने तसेच खेळत राहिले पाहिजे. मी स्वतः त्याच्याशी बोललो आहे आणि त्याला नैसर्गिक खेळ करायचा सल्ला दिला आहे. तो ऑस्ट्रेलिया किंवा कोणत्याही देशात खेळला तरी आक्रमकच खेळेल आणि खूप धावा करेल अशी मला त्याच्याकडून अपेक्षा आहे.”
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -