प्रियांक पांचाळचे शतक

भारत अ-द.आफ्रिका अ सामना अनिर्णित

Mumbai

भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ या संघांमधील दुसरा अनौपचारिक कसोटी सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे भारत अ संघाने दोन सामन्यांची ही मालिका १-० अशी जिंकली. या मालिकेतील पहिला सामना भारत अ संघाने ७ विकेट राखून जिंकला होता.

या सामन्याच्या चौथ्या आणि अखेरच्या दिवशी भारत अ संघाचा सलामीवीर प्रियांक पांचाळने १०९ धावांची खेळी केली, ज्यात ९ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीमुळे भारत अने दुसरा डाव ३ बाद २०२ या धावसंख्येवर घोषित केला. त्यांच्याकडे २१९ धावांची आघाडी होती. यानंतर दक्षिण आफ्रिका ’अ’ संघाला दुसर्‍यांदा फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही.

दुसर्‍या डावात स्थानिक क्रिकेटमध्ये गुजरातकडून खेळणार्‍या पांचाळने पहिल्या विकेटसाठी अभिमन्यू ईश्वरनसोबत ९४ धावांची भागीदारी केली. ईश्वरनला ३७ धावांवर ऑफस्पिनर डीन पाईडने बाद केले. पहिल्या डावात ९२ धावा करणार्‍या शुभमन गिलला दुसर्‍या डावात खातेही उघडता आले नाही. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या करुण नायरने पांचाळच्या साथीने तिसर्‍या विकेटसाठी ९२ धावांची भागी केली. पांचाळला १०९ धावांवर सेनूरन मुथुसामीने माघारी पाठवले. करुणने मात्र चांगली फलंदाजी सुरु ठेवत नाबाद ५१ धावांची खेळी केली. त्याने पहिल्या डावात ७८ धावा केल्या होत्या.

त्याआधी भारत अ संघाने प्रथम फलंदाजी करताना ४१७ धावा केल्या होत्या. याचे उत्तर देताना कर्णधार एडन मार्करम (१६१) आणि वियान मुल्डर (१३१) यांनी शतके करूनही दक्षिण आफ्रिकेला ४०० धावाच करता आल्या. त्यामुळे भारत अला १७ धावांची आघाडी मिळाली होती.

संक्षिप्त धावफलक – भारत अ : ४१७ आणि ३ बाद २०२ डाव घोषित (प्रियांक पांचाळ १०९, करुण नायर नाबाद ५१, अभिमन्यू ईश्वरन ३७; डीन पाईड २/८८) वि. दक्षिण आफ्रिका अ : सर्वबाद ४००.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here