घरक्रीडागौरवास्पद ‘पंगा’!

गौरवास्पद ‘पंगा’!

Subscribe

मागील मंगळवारी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची यादी जाहीर झाल्यानंतर त्यातील काही नावे वाचून अनेकांनी भुवया उंचावल्या. या व्यक्तीचे नक्की काम काय, याला हा मनाचा पुरस्कार कशासाठी, असे प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र, बरेच खेळाडू असे होते की, ज्यांना शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाल्याचे कोणालाही आश्चर्य वाटले नाही. रिशांक देवाडिगा आणि गिरीश इर्नाक या कबड्डीपटूंचा या खेळाडूंमध्ये समावेश होतो.

‘ले पंगा’ म्हणत काही वर्षांपूर्वी प्रो-कबड्डी नावाच्या स्पर्धेला सुरुवात झाली. मात्र, कबड्डी या आपल्या मातीतील खेळाला लोकप्रियता मिळेल का, असे बरेच प्रश्न अनेकांच्या मनात होते. परंतु, या प्रश्नांची उत्तरे मिळायला फारसा वेळ लागला नाही. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर मिळालेली ही संधी कबड्डीपटूंनी वाया जाऊ दिली नाही. या स्पर्धेमुळे खेळाडूंना घराघरात पोहचण्याची संधी मिळाली आणि नावलौकिक मिळाला. महाराष्ट्राच्या मातीतील रिशांक देवाडिगा आणि गिरीश इर्नाक यांनाही आपली छाप पाडण्यात यश आले. एक खेळाडू चढाईतील, तर दुसरा पकडीचा! परंतु, दोघांनीही कठीण परिस्थितून मार्ग काढत यशाची शिखरे गाठली. त्यांच्या कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांचा मानाच्या शिवछत्रपती पुरस्काराने गौरव केला.

मूळचा अहमदनगरचा असणारा गिरीश इर्नाक वडील रेल्वेत नोकरीला असल्यामुळे कुटुंबियांसह कल्याणमध्ये स्थायिक झाला. ज्ञानमंदिर शाळेतील पिटी शिक्षकांनी गिरीशमधील प्रतिभा हेरली आणि तिथून त्याच्या कबड्डीतील प्रवासाला सुरुवात झाली. तो सर्वात आधी कल्याणच्या नामांकित ओम कबड्डी संघातून खेळला. त्यानंतर त्याला एअर इंडियात नोकरी करण्याची आणि कबड्डी खेळण्याची संधी मिळाली. पुढे त्याने भारत पेट्रोलियमचेही प्रतिनिधित्व केले. डावा कोपरारक्षक (लेफ्ट कॉर्नर) असणार्‍या गिरीशने प्रत्येक टप्प्यावर दमदार कामगिरी केल्यामुळे त्याची महाराष्ट्र आणि भारताच्या संघात निवड झाली. मात्र, क्रीडा रसिकांना त्याची खरी ओळख झाली ती प्रो-कबड्डी लीगमधील सातत्यपूर्ण खेळामुळे!

- Advertisement -

पहिल्या दोन मोसमांत पाटणा पायरेट्स संघाकडून खेळताना गिरीशने २५ सामन्यांत एकूण ५२ गुण मिळवले, ज्यापैकी ५० गुण होते पकडीचे! त्याच्या या कामगिरीमुळे पाटणाला या दोन्ही मोसमांत उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास करण्यात यश आले. प्रो-कबड्डीच्या लीगच्या पुढील दोन मोसमांत त्याने बंगाल वॉरियर्स संघाचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेच्या तिसर्‍या मोसमात सर्वाधिक पकडीचे गुण मिळवणार्‍या खेळाडूंमध्ये गिरीश (११ सामन्यांत ३३) आठव्या स्थानी राहिला. मागील तीन मोसम गिरीश पुणेरी पलटण संघाकडून खेळला. या तीन मोसमांत सामन्यांची संख्या वाढवण्यात आली होती आणि गिरीशने पुरेपूर फायदा घेतला. त्याने या स्पर्धेच्या पाचव्या आणि पुणेरीकडून खेळताना आपल्या पहिल्याच मोसमाच्या २१ सामन्यांत ६४ पकडीचे गुण मिळवण्याची किमया साधली. या दमदार कामगिरीमुळे त्याची प्रो-कबड्डीमधील सर्वोत्तम पकडीच्या खेळाडूंमध्ये गणना होऊ लागली.

गिरीशप्रमाणेच अनेक आव्हानांवर मात करुन पुढे आलेला कबड्डीपटू म्हणजे रिशांक देवाडिगा. सुरुवातीला सांताक्रूझ येथे एका झोपडपट्टीत राहणार्‍या रिशांकच्या वडिलांचे त्याच्या लहानपणी निधन झाले. मात्र, आईने कष्ट करुन रिशांक आणि त्याच्या बहिणीला लहानाचे मोठे केले. रिशांकनेही घराला हातभार लागावा म्हणून कॉलेजमध्ये असताना वेटरचे काम केले. मात्र, तसे करत असताना त्याचे कबड्डीकडे दुर्लक्ष झाले नाही. एका जिल्हास्तरीय स्पर्धेतील चमकदार कामगिरीमुळे त्याला देना बँकेकडून खेळण्याची संधी मिळाली. पुढे त्याने भारत पेट्रोलियम, महाराष्ट्र आणि भारतीय संघाचेही प्रतिनिधित्व केले.

- Advertisement -

परंतु, बर्‍याच कबड्डीपटूंप्रमाणे रिशांकच्याही आयुष्याला कलाटणी मिळाली ती प्रो-कबड्डी लीगमुळे! या स्पर्धेच्या पहिल्या चार मोसमांत तो यु-मुंबा संघाकडून खेळला. अनुप कुमारसारखा उत्कृष्ट चढाईचा खेळाडू यु-मुंबाकडे असल्याने रिशांकला फारशा चढाया करायला मिळाल्या नाहीत. त्याच्यावर मुख्य जबाबदारी होती ती डू-ऑर-डाय रेड करण्याची. त्याने ही जबाबदारी चोख पार पाडताना यु-मुंबाकडून दुसर्‍या, तिसर्‍या आणि चौथ्या मोसमात सर्वाधिक डू-ऑर-डाय चढाईचे गुण मिळवले. तसेच दुसर्‍या मोसमात सर्वाधिक चढाईचे गुण मिळवणार्‍या खेळाडूंत तो दुसर्‍या (१६ सामन्यांत १०६) स्थानी होता.

या दमदार कामगिरीनंतर युपी योद्धाने पाचव्या मोसमाआधी झालेल्या खेळाडू लिलावात त्याच्यावर ४५.५० लाख, तर सहाव्या मोसमाआधी तब्बल १.११ कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात समाविष्ट करुन घेतले. प्रो-कबड्डीप्रमाणेच रिशांकने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपली छाप पाडली आहे. २०१७-१८ मध्ये रिशांकच्या नेतृत्वात महाराष्ट्राने तब्बल ११ वर्षांनंतर सिनियर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा जिंकली. तसेच २०१८ मध्ये कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धा जिंकणार्‍या भारतीय संघाचा तो भाग होता. इतक्या उत्कृष्ट कामगिरीनंतर त्याचा मानाच्या शिवछत्रपती पुरस्काराने गौरव झाला याचे नवल नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -