चौथ्या क्रमांकासाठी पुजारा सर्वोत्तम पर्याय

सौरव गांगुलीचे मत

Delhi
Sourav Ganguly

इंग्लंडमध्ये मे महिन्यात सुरू होणार्‍या विश्वचषकासाठी भारतीय संघात आणि त्यातही अंतिम ११ खेळाडूंमध्ये कोण असणार हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, अजूनही भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समितीपुढे एका जागेवरून मोठा प्रश्न आहे. ती जागा आहे चौथा क्रमांक. भारताने मागील काही काळात अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक, अंबाती रायडू यासारख्या खेळाडूंना चौथ्या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली. पण, कोणालाही फार चांगली कामगिरी करता आलेली नाही. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत युवा रिषभ पंत आणि विजय शंकर यांनाही भारताने संधी देऊन बघितली. मात्र, त्यांना फारसे यश लाभले नाही. त्यामुळे चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार हा अजूनही प्रश्नच आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या मते, या क्रमांकासाठी चेतेश्वर पुजारा हा सर्वोत्तम पर्याय आहे.

काही लोकांना मी काय बोलतोय हे पटणार नाही. काही लोक माझ्या मतावर हसतीलही. पण, माझ्या मते चौथ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा खेळायला हवा. त्याचे क्षेत्ररक्षण जरा ढिसाळ आहे. मात्र, तो अप्रतिम फलंदाज आहे. काही लोकांना माझे मत ऐकून धक्काही बसला असेल. पण, तुम्हाला संघात एका चांगल्या फलंदाजाची गरज आहे, जो याआधी संधी दिलेल्या फलंदाजांपेक्षा चांगला आहे. त्यामुळे भारतीय संघात चौथ्या क्रमांकासाठी पुजाराच सर्वोत्तम पर्याय आहे, असे गांगुलीने सांगितले.

तसेच गांगुली पुढे म्हणाला, याआधी राहुल द्रविड ज्याप्रमाणे एकदिवसीय संघात महत्त्वाची भूमिका बजावायचा, त्याचप्रमाणे पुजाराही महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. हे फक्त माझे मत आहे, अनेक लोक याच्याशी सहमत होणार नाहीत. मात्र, काही वेळा एकदिवसीय क्रिकेटमध्ये तुम्हाला फलंदाजीमध्ये स्थैर्य हवे असते आणि ते पुजारा तुम्हाला देऊ शकतो. भारताच्या कसोटी संघातील प्रमुख फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा पुजारा एकदिवसीय क्रिकेटमध्ये अवघे ५ सामने खेळला आहे. पण, त्याची स्थानिक एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी खूप चांगली आहे. त्याने १०३ सामन्यांमध्ये ५४.२० च्या सरासरीने ४४४५ धावा केल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here