घरक्रीडाभारतावर दबाव टाकला;विजय मिळवला - डी कॉक

भारतावर दबाव टाकला;विजय मिळवला – डी कॉक

Subscribe

तिसर्‍या टी-२० सामन्यात भारताचा ९ विकेट राखून पराभव करत दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. दक्षिण आफ्रिकेच्या संघात बर्‍याच युवा खेळाडूंचा समावेश होता आणि यापैकी काही खेळाडू पहिल्यांदा भारतात खेळत होते. मात्र, असे असतानाही या खेळाडूंनी ज्याप्रकारे भारतासारख्या उत्कृष्ट संघाला झुंज दिली, त्याने कर्णधार क्विंटन डी कॉकला प्रभावित केले.

भारताने या सामन्याची अप्रतिम सुरुवात करत पहिल्या ६ षटकांत १ बाद ५४ अशी मजल मारली होती. परंतु, दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारताच्या फलंदाजांवर दबाव टाकला आणि त्यामुळे भारताला २० षटकांत १३४ धावाच करता आल्या. दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान १७ व्या षटकात पूर्ण करत हा सामना जिंकला.

- Advertisement -

भारताने या सामन्याची उत्तम सुरुवात केली होती. मात्र, आमच्या खेळाडूंनी ज्याप्रकारे पुनरागमन केले आणि त्यांनी ज्याप्रकारे झुंज दिली, त्याने मी खूप प्रभावित झालो. त्यांनी आम्ही आखलेल्या योजनेनुसारच खेळ केला. त्यांनी भारतावर दबाव टाकला. त्यामुळे आम्ही हा सामना जिंकू शकलो, असे डी कॉकने सामन्यानंतर सांगितले.

या मालिकेतील आपला पहिला सामना खेळणार्‍या ब्यूरन हॅन्ड्रिक्सने चार षटकांमध्ये केवळ १४ धावांच्या मोबदल्यात २ गडी बाद केले. त्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. त्याची स्तुती करताना डी कॉक म्हणाला, ब्यूरनने दक्षिण आफ्रिकेतील स्थानिक टी-२० स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. या सामन्याआधी त्याने बरीच मेहनत घेतली होती. त्यामुळे आम्ही त्याला संधी दिली आणि त्याने संधीचे सोने केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -