घरक्रीडावर्णद्वेष, निषेध आणि खेळ!

वर्णद्वेष, निषेध आणि खेळ!

Subscribe

अमेरिकेतील मिनियापोलीस शहरात जॉर्ज फ्लॉईड या ४६ वर्षीय आफ्रिकन-अमेरिकन (कृष्णवर्णीय) व्यक्तीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. एका गौरवर्णीय पोलीस अधिकाऱ्याने बराच वेळ फ्लॉईडच्या मानेवर गुडघा ठेवून त्याला जखडले आणि त्यामुळे गुदमरुन त्याचा मृत्यू झाला. याचे तीव्र पडसाद अमेरिकेसह जगात उमटत आहेत. अमेरिकेत गौरवर्णीय पोलीस अधिकाऱ्याने कृष्णवर्णीय व्यक्तीची हत्या केल्याची ही पहिली घटना नाही. त्यामुळे पोलिसांच्या या अमानवी वागणुकीला विरोध दर्शवण्यासाठी अमेरिकेतील सर्वच राज्यांत आंदोलने सुरु आहेत. यामध्ये खेळाडूही मागे नाहीत. खासकरुन एनएफएल आणि एनबीए या अमेरिकेतील दोन प्रमुख स्पर्धांमधील लोकप्रिय खेळाडू सोशल मीडिया किंवा थेट आंदोलनात सहभाग घेत आपला विरोध दर्शवत आहेत.  

‘आय कान्ट ब्रीद’ असे लिहिलेले काळ्या रंगाचे टी-शर्ट घालून नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन (एनबीए) या जगातील सर्वात मोठ्या बास्केटबॉल स्पर्धेतील सर्वात लोकप्रिय खेळाडू असणाऱ्या लेब्रॉन जेम्स आणि बऱ्याच अन्य खेळाडूंनी सामने सुरु होण्याआधी सराव केला होता. ते वर्ष होते २०१४! त्यांनी हे टी-शर्ट घालण्यामागचे कारण होते, एरीक गार्नर या कृष्णवर्णीय व्यक्तीची हत्या. गौरवर्णीय पोलिसाने गार्नरचा गळा पकडून ठेवल्याने गुदमरुन त्याचा मृत्यू झाला. गार्नरचे अखेरचे शब्द होते ‘आय कान्ट ब्रीद!’ त्यामुळे गौरवर्णीय पोलिसांच्या अमानवी वागणुकीला निषेध दर्शवण्यासाठी आणि गार्नरला न्याय मिळावा यासाठी जेम्ससह अन्य खेळाडूंनी ते टी-शर्ट घातले.

या घटनेला आता सहा वर्षे उलटून गेली आहेत. परंतु, अमेरिकेत अशाप्रकारच्या घटना थांबलेल्या नाहीत. २५ मे रोजी अमेरिकेतील मिनियापोलीस शहरात जॉर्ज फ्लॉईड या आफ्रिकन-अमेरिकन (कृष्णवर्णीय) व्यक्तीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. एका गौरवर्णीय पोलीस अधिकाऱ्याने बराच वेळ फ्लॉईडच्या मानेवर गुडघा ठेवून त्याला जखडले आणि त्यामुळे गुदमरुन त्याचा मृत्यू झाला. फ्लॉईडने एक वस्तू विकत घेण्यासाठी २० डॉलर्सची खोटी नोट दिल्याचा संशय दुकानात काम करण्याऱ्या व्यक्तीला आला. या संशयावरुनच पोलिसांनी फ्लॉईडला अटक केली. परंतु, काहीही स्पष्ट होण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. गौरवर्णीय पोलीस अधिकाऱ्याने मानेवर गुडघा ठेवल्यानंतर फ्लॉईडनेही ‘आय कान्ट ब्रीद’ हे शब्द उच्चारले होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेसह जगामध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले.

- Advertisement -

अमेरिकेतील सर्वच राज्यांमध्ये आंदोलने सुरु झाली. काही ठिकाणी याला हिंसक वळणही लागले. ‘आता आम्ही अन्याय सहन करणार नाही. वर्णद्वेषथांबलाच पाहिजे. गौरवर्णीय पोलीस कृष्णवर्णीय व्यक्तींना देत असलेली अमानवी वागणूक थांबलीच पाहिजे’, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते. अमेरिकेतील सामान्य गौरवर्णीय व्यक्तींनीही याची दखल घेत आपल्या कृष्णवर्णीय बांधवाना पाठिंबा दिला. यामध्ये खेळाडूही मागे नव्हते. खासकरुन नॅशनल फुटबॉल लीग (एनएफएल) आणि नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन (एनबीए) या अमेरिकेतील दोन प्रमुख स्पर्धांमधील लोकप्रिय खेळाडू सोशल मीडिया किंवा थेट आंदोलनात सहभाग घेत आपला विरोध दर्शवत आहेत.

एनएफएल ही आताच्या घडीला अमेरिकेत सर्वाधिक बघितली जाणारी स्पर्धा! या स्पर्धेत खेळणारे ७० टक्के खेळाडू हे कृष्णवर्णीय आहेत. दुसरीकडे एनबीए ही जगातील सर्वात लोकप्रिय बास्केटबॉल स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेत साधारण ८० टक्के कृष्णवर्णीय खेळाडू खेळतात. या खेळाडूंनाही कधीनाकधी वर्णद्वेषाचा सामना करावा लागला आहे आणि या विरोधात हे खेळाडू वेळोवेळी आवाज उठवत असतात. तसेच समाजात कृष्णवर्णीय व्यक्तींवर होणाऱ्या अन्यायालाही हे खेळाडू वाचा फोडत असतात.

- Advertisement -

२०१६ मध्ये एनएफएल संघ सॅनफ्रॅन्सिस्को फोर्टीनाईनर्सचा खेळाडू कॉलिन कॅपर्नीकवर बरीच टीका झाली होती. राष्ट्रगीत सुरु असताना उभे राहण्याची पद्धत आहे. परंतु, २०१६ एनएफएल मोसमातील फोर्टीनाईनर्सच्या तिसऱ्या सराव सामन्याआधी अमेरिकेचे राष्ट्रगीत सुरु असताना अमेरिकेचा नागरिक असलेला कॅपर्नीक बेंचवरती बसून राहिला, तर पुढील सामन्याआधी राष्ट्रगीत सुरु असताना सैनिकांचा अनादर होऊ नये म्हणून त्याने बसून न राहता एक गुडघा टेकून उभे राहण्याचा निर्णय घेतला. तू कशाचा निषेध करत आहेस असे विचारल्यावर त्याने सांगितले, “मी त्या देशाच्या झेंड्याचा आदर करणार नाही, जिथे कृष्णवर्णीय लोकांना वाईट वागणूक दिली जाते. सध्या देशात जे घडत आहे त्याकडे दुर्लक्ष करणे हा स्वार्थीपणा ठरेल. लोकांना मारण्यासाठी काहींना पैसे मिळत आहेत.” कॅपर्नीक त्यावेळी गौरवर्णीय पोलिसांच्या हातून कृष्णवर्णीय व्यक्तींच्या झालेल्या हत्यांविषयी बोलत होता.

त्यानंतर एनएफएल आणि इतर अमेरिकन स्पर्धांमधील कृष्णवर्णीय खेळाडूंनीही कॅपर्नीकचे अनुकरण करत अमेरिकन राष्ट्रगीताच्या वेळी गुडघ्यावर बसण्यास सुरुवात केली. मात्र, याचा फटका एनएफएलला बसला. ही स्पर्धा बघणाऱ्यांची संख्या ८ टक्क्यांनी कमी झाली. २०१६ मोसमानंतर कॅपर्नीकचा फोर्टीनाईनर्स संघासोबतचा करार संपुष्टात आला. त्यानंतर कोणत्याही संघाने त्याला करारबद्ध केले नाही. कॅपर्नीकने निषेध दर्शवल्यामुळे त्याला एनएफएलमधून बाहेर काढण्यात आले असा आरोपही झाला. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. परंतु, कॅपर्नीकने त्यावेळी म्हणजेच चार वर्षांपूर्वी जो निषेध दर्शवला होता, तो किती महत्त्वाचा होता हे लोकांना आता उमगत आहे.

जॉर्ज फ्लॉईडचा मृत्यू झाल्यानंतर कॅपर्नीकने पोलिसांच्या क्रूर वागणुकीला निषेध करणाऱ्यांना पाठिंबा दिला. यावेळी त्याला इतर खेळाडूंचीही साथ मिळाली. केवळ अमेरिकेतील नाही, तर जगातील! लेब्रॉन जेम्स, गोल्फर टायगर वूड्स, टेनिसपटू कोको गॉफ यांच्यासह अन्य बऱ्याच अमेरिकन कृष्णवर्णीय खेळाडूंनी घडलेल्या घटनेला विरोध दर्शवला. स्टेफन करी, डेमियन लिलर्ड, जेलन ब्राऊन, माल्कम ब्रॉगडन, ट्रे यंग यांसारख्या एनबीएतील खेळाडूंनी आंदोलनांमध्ये सहभाग घेतला. तसेच रॉजर फेडरर, राफेल नदाल, मारिया शारापोव्हा, नाओमी ओसाका, पॉल पोग्बा, किलियन एम्बापे, क्रिस गेल, डॅरेन सॅमी यांसारख्या जगभरातील असंख्य आघाडीच्या क्रीडापटूंनी वर्णद्वेष आणि फ्लॉईडच्या हत्येला निषेध दर्शवताना ‘ब्लॅक लाईव्हस मॅटर’ या चळवळीत सहभाग घेतला.

फ्लॉईड मेवेदर या जगातील सर्वात श्रीमंत बॉक्सरने जॉर्ज फ्लॉईडच्या अंत्यसंस्कार आणि शोकसभेचा संपूर्ण खर्च उचलण्याची तयारी दर्शवली. त्याचप्रमाणे जर्मनीतील फुटबॉल स्पर्धा बुंडसलिगामध्ये हॅटट्रिक केल्यानंतर जेडन सँचो या बुरुसिया डॉर्टमंड संघाच्या इंग्लिश कृष्णवर्णीय खेळाडूने ‘जस्टीस फॉर जॉर्ज फ्लॉईड’ असे लिहिलेला टी-शर्ट दाखवला. त्याचा सहकारी अश्रफ हकीमीने असाच टी-शर्ट घालत, तर बुरुसिया मोंचेनग्लाडबागचा खेळाडू मार्कस थूरामने गुडघा टेकून उभे राहत आपला निषेध दर्शवला.

निषेध, आंदोलने यांचा परिणाम म्हणून जॉर्ज फ्लॉईडच्या मानेवर गुडघा ठेवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर हत्येचा, तर घटनास्थळी उपस्थित असलेल्या अन्य तीन पोलिसांवर हत्या करणाऱ्या अधिकाऱ्याला मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि त्यांना अटक झाली. मात्र, या चौघांना अटक झाली म्हणून ही आंदोलने यशस्वी झाली असे आपण खरच म्हणू शकतो का? बहुदा नाही. अमेरिकेसह जगात वर्णद्वेष थांबेल, कृष्णवर्णीय आणि गौरवर्णीयांना समान वागणूक मिळेल, तेव्हाच ही आंदोलने पूर्णपणे यशस्वी झाली असे आपल्याला म्हणता येईल. या सर्व प्रक्रियेत खेळ आणि खेळाडू महत्त्वाची भूमिका बजावत होते, आहेत आणि पुढेही राहतील हे निश्चित!

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -