अधिराज्य!

राफेल नदाल या स्पेनच्या टेनिसपटूची 'क्ले कोर्ट'चा बादशाह अशी ख्याती आहे. फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेत नदालने अधिराज्य गाजवले असून यंदा त्याने विक्रमी १३ व्यांदा या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. ग्रँड स्लॅम मालिकेतील कोणत्याही एका स्पर्धेत विजेतीपदे मिळवण्याचा हा विक्रम. तो मागे टाकायचा विचारही फारसा कुणी करणार नाही. मग तो पुसला जाण्याची शक्यताच नाही, असे अँडी मरेसारखा ऑलिम्पिक तसेच विम्बल्डन विजेता म्हणतो, त्यात वावगे काय?

राफेल नदाल

यंदाच्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत आपला सामना खेळायला ‘राफा’ नदाल कोर्टवर आला, त्यावेळी कुणीतरी म्हणालं, ‘राजा आपल्या महालात आलाय!’ सर्वांनाच ते पटलं. आणि दिवसांतच या राजाने आपली सत्ता अबाधित असल्याचं सिद्ध केलं. निर्विवादपणे! संपूर्ण स्पर्धेत त्यानं एकही सेट गमावला नाही आणि अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या नोवाक जोकोविचला ६-०, ६-२, ७-५ असे हरविले. यातच त्याचे वर्चस्व दिसले.

केवळ १९ वर्षाचा असतानाच, २००५ मध्ये नदालने या स्पर्धेचे पहिले अजिंक्यपद पटकावले होते. (आजवरचा तो सर्वात तरुण विजेता) आणि यंदा ३४ व्या वर्षी याच स्पर्धेत तो १३ व्यांदा विजेता ठरला. ग्रँड स्लॅम मालिकेतील कोणत्याही एका स्पर्धेत विजेतीपदे मिळवण्याचा हा विक्रम. तो मागे टाकायचा विचारही फारसा कुणी करणार नाही. मग तो पुसला जाण्याची शक्यताच नाही, असे अँडी मरेसारखा ऑलिम्पिक तसेच विम्बल्डन विजेता म्हणतो, त्यात वावगे काय?

उजव्या हाताने बहुतेक खेळणारे आहेत. पण डावऱ्या खेळाडूंवर मात करणे अनेकांना अवघड जाते असे राफाच्या काकाला वाटायचे (तो रॉड लेव्हर या २ वेळा ग्रँड स्लॅम – म्हणजे दोनदा चार स्लॅम (मोठ्या) स्पर्धांची अजिंक्यपदे एकाच वर्षी मिळवणाऱ्या महान खेळाडूचा चाहता असावा). काकाने हट्टानेच राफाला (तो नैसर्गिक डावरा नसावा) डावरा बनवले. आज्ञाधारक पुतण्याने ते धडे मनापासून गिरवले. काही काळातच त्याला याचा लाभ होऊ लागला. नुसते खेळातील कौशल्य असून भागत नाही. त्याला चापल्य, ताकद, तंदुरुस्ती यांची जोड असावी लागते. त्यासाठी नदाल आजही प्रयत्नशील असतो. या स्पर्धेतही त्याचे हे सर्व गुण दिसले.

वेळापत्रक बदलल्यामुळे यंदा फ्रेंच ओपन स्पर्धेला मे अखेरऐवजी (कोविड १९ मुळे) सप्टेंबर अखेर सुरु झाली. उन्हाच्या झळांऐवजी थंडीच्या गारठ्यात अनेक खेळाडूंना या बदलाशी जुळवून घेता आले नाही. त्यातच चेंडूही नव्या कंपनीचे निवडले गेले होते, त्याबाबतही कुरकूर झाली. नदाल मात्र अगदी नेहमीच्या सफाईने खेळत होता. एका प्रतिस्पर्ध्याने ‘अंडरहॅन्ड (आर्म) सर्व्हिस’ करूनही पाहिली. राफा अविचलितच. ‘हे नियमाला धरून आहे,’ एवढेच तो म्हणाला. अर्थात सामन्याच्या निकालावर याचा काहीच परिणाम झाला नाही. नदालची भेदक सर्व्हिस, जोरकस परतीचे फटके, लॉब्ज आणि नेटजवळील अलगद फटके तसेच नेटजवळ येत मारलेले स्मॅश, त्याच्या टॉप-स्पिन फटक्यांना तर तोडच नाही. या फटक्यांत चेंडूच्या गरगर फिरण्याचा वेग मिनिटाला ३६०० गिरक्यांपेक्षाही जास्त होता.

नदाल या स्पर्धेत आजवर १०२ सामने खेळला व यंदाचा अंतिम फेरीतला विजय हा त्याचा १०० वा विजय होता. (तो सामने हरला ते दुखापत झाल्याने, तरीही सामना न सोडता तो संपेपर्यंत खेळत राहिला होता.) आता सर्वाधिक स्लॅम विजेतीपदे जिंकणाऱ्या रॉजर फेडररशी २० वे विजेतेपद जिंकून नदालने बरोबरी साधून आपणही त्याच्या तोडीचेच असल्याचे दाखवून दिले आहे. त्याला सलाम करण्याशिवाय आपण अधिक काय करू शकतो?