तेवातिया कोरोनाची लसही बनवू शकतो; अफलातून कॅचनंतर सेहवागचे ट्विट

सेहवागने तेवातियाबाबत गमतीशीर ट्विट केले.     

राहुल तेवातिया

यंदाच्या आयपीएल मोसमात राजस्थान रॉयल्सला चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. आज झालेल्या आयपीएलच्या सामन्यात त्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाने ७ विकेट राखून पराभूत केले. हा त्यांचा यंदा नऊ सामन्यांत सहावा पराभव ठरला. राजस्थान संघाला चांगली कामगिरी करता आली नसली, तरी त्यांच्या एका खेळाडूने मात्र सर्वांनाच खूप प्रभावित केले आहे. तो खेळाडू म्हणजे अष्टपैलू राहुल तेवातिया. तेवातियाने गोलंदाजी आणि खासकरून फलंदाजीत आपली चमक दाखवली होती. मात्र, आज झालेल्या सामन्यात त्याने अफलातून झेल पकडला. त्यामुळे ‘सध्या तेवातिया काहीही करू शकतो,’ असे मजेशीर ट्विट विरेंद्र सेहवागने केले.

तेवातिया काहीही करू शकतो

भारताचा माजी सलामीवीर सेहवाग गमतीशीर ट्विट आणि वक्तव्यांसाठी ओळखला जातो. तो बरेचदा सामन्यांदरम्यान खेळाडूंबाबत काहीतरी ट्विट करतो. आता तेवातियाबाबत त्याने खास ट्विट केले. ‘तेवातिया काहीही करू शकतो. सध्या त्याचेच दिवस आहेत. त्यामुळे कोरोनावर लस बनवण्याची संधी दिली, तर बहुतेक तेही तो बनवेल. यंदा त्याने अप्रतिम खेळ केला आहे,’ असे सेहवागने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले.

युवराजनेही केले कौतुक 

आज झालेल्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात तेवातियाने उत्कृष्ट झेल पकडला. आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने युवा वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, सीमारेषेव रतेवातियाने उत्कृष्ट झेल पकडल्याने कोहलीला ४३ धावांवर माघारी परतावे लागले. त्यामुळे युवराज सिंगनेही तेवातियाचे कौतुक केले. ‘तेवातियाने हा झेल पकडत सामना फिरवल्याचे युवराज म्हणाला.