घरक्रीडापंतसाठी बॅड न्यूज!

पंतसाठी बॅड न्यूज!

Subscribe

राहुलच करणार यष्टिरक्षण; कोहलीचे संकेत

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात पॅट कमिन्सचा उसळी घेतलेला चेंडू बॅटची कड घेऊन हेल्मेटला लागल्याने भारताचा युवा खेळाडू रिषभ पंतला दुखापत झाली. कन्कशनच्या नियमानुसार त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आणि तो यष्टिरक्षण करण्यासाठी येऊ शकला नाही. तसेच त्याला पुढील दोन्ही सामन्यांना मुकावे लागले.

त्याच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलला यष्टिरक्षणाची संधी मिळाली आणि त्याने या संधीचे सोने करत आपली उपयोग्यता सिद्ध केली. पंतला मागील काही काळात धावांसाठी झुंजावे लागत आहे, तर तो यष्टींमागेही बर्‍याच चुका करत आहे. त्यामुळे त्याच्या संघातील स्थानाबाबत बरेच प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यातच राहुलने यष्टिरक्षण केल्यास आम्ही एक अतिरिक्त फलंदाज खेळवू शकतो आणि त्यामुळे संघ अधिक संतुलित होतो, असे विधान तिसर्‍या सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने करत पंतचे एकदिवसीय संघातील स्थान धोक्यात असल्याचे संकेत दिले आहेत.

- Advertisement -

आम्हाला याआधी संघात कोणाला, कुठे खेळवायचे याबाबत स्पष्टता नव्हती. मात्र, आम्ही आता जे योग्य वाटेल, ते करण्याचा निर्णय घेतला आहे. संघात सतत बदल करुन आम्हाला खेळाडूंवर विनाकारण दबाव टाकायचा नाही. आम्ही संघात एकही बदल केला नाही आणि सलग दोन सामने जिंकले. त्यामुळे आता संघात बदल करण्याची काही गरज आहे, असे मला वाटत नाही. राहुलने यष्टिरक्षण केल्यास आमचा संघ अधिक संतुलित होतो. तसेच आम्हाला एक अतिरिक्त फलंदाज खेळवण्याची संधी मिळते. तुम्हाला जर आठवत असेल, तर २००३ विश्वचषकात राहुल भाईने (द्रविड) यष्टिरक्षण केले होते. त्यामुळे भारताने एक अतिरिक्त फलंदाज खेळवला आणि आघाडीच्या फलंदाजांना आपला नैसर्गिक खेळ करण्याची मोकळीक मिळाली, असे कर्णधार कोहली म्हणाला.

राहुलमधील सुधारणा वाखाणण्याजोगी!
लोकेश राहुलला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांत तीन वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली. त्याने पहिल्या सामन्यात तिसर्‍या आणि दुसर्‍या सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली. तर शिखर धवनला दुखापत झाल्याने निर्णायक सामन्यात त्याला सलामीला यावे लागले. याविषयी कर्णधार कोहलीने सांगितले, राहुलची कोणत्याही क्रमांकावर खेळण्याची तयारी आहे. तो पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी करू शकत नाही. मात्र, जास्त धोका न पत्करता वेगाने धावा करण्याची त्याच्यात क्षमता आहे आणि त्याने हे राजकोटमध्ये (५२ चेंडूत ८०) दाखवले. त्याने मागील सहा महिन्यांत आपल्या खेळात केलेली सुधारणा फारच वाखाणण्याजोगी आहे.

- Advertisement -

मालिका जिंकल्याचे समाधान!
ऑस्ट्रेलियाने २०१९ मध्ये भारताविरुद्ध भारतात एकदिवसीय मालिका जिंकली होती. त्या ऑस्ट्रेलियन संघात स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नरचा समावेश नव्हता. मात्र, आता हे प्रमुख खेळाडू असताना ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्याचे खूप समाधान आहे, असे भारताचा कर्णधार विराट कोहलीने सांगितले. ऑस्ट्रेलियाच्या संघात स्मिथ, वॉर्नर आणि मार्नस लबूशेन यांचा समावेश होता. त्यांच्याकडे अप्रतिम गोलंदाजही आहेत. आम्ही त्यांच्याविरुद्ध मागील मालिकेत अखेरचे तीन सामने गमावले होते. यावेळी आम्ही पहिला सामना गमावला, पण पुढील दोन सामन्यांत चांगले पुनरागमन करत मालिका जिंकल्याचे समाधान आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -