घरक्रीडासर्फराजची बॅट पुन्हा तळपली!

सर्फराजची बॅट पुन्हा तळपली!

Subscribe

हिमाचल प्रदेशविरुद्ध द्विशतक; मुंबई ५ बाद ३७२,रणजी करंडक

उत्तर प्रदेशविरुद्धच्या मागील रणजी सामन्यात त्रिशतक झळकावणार्‍या मुंबईच्या सर्फराज खानने आपला दमदार फॉर्म कायम राखला आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या हिमाचल प्रदेशविरुद्धच्या रणजी सामन्यात त्याने अवघ्या २१३ चेंडूत ३२ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद २२६ धावांची खेळी केली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्रिशतकानंतर पुढील सामन्यात द्विशतक करणारा सर्फराज हा डब्ल्यूवी रामन यांच्यानंतर केवळ दुसरा भारतीय फलंदाज आहे. त्याच्या या कामगिरीमुळे सुरुवातीला अडचणीत सापडलेल्या मुंबईची पहिल्या दिवसअखेर ५ बाद ३७२ अशी धावसंख्या होती.

धर्मशाळा येथे होत असलेल्या या सामन्यात हिमाचल प्रदेशचा कर्णधार अंकित काल्सीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मध्यम गती गोलंदाज वैभव अरोराने मुंबईचे युवा सलामीवीर जय बिस्ता (१२) आणि भूपेन लालवाणी (१) यांना एकाच षटकात माघारी पाठवले. पुढच्याच षटकात हार्दिक तामोरेला (२) कन्वर अभिनयने पायचीत पकडत मुंबईला आणखी एक झटका दिला. त्यामुळे ५ षटकांनंतर मुंबईची ३ बाद १६ अशी अवस्था होती. मात्र, अनुभवी सिद्धेश लाड आणि सर्फराज यांनी मुंबईचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी रचली. राघव धवनने लाडचा २० धावांवर त्रिफळा उडवत ही जोडी फोडली.

- Advertisement -

सर्फराजने एक बाजू लावून धरत हिमाचलच्या गोलंदाजांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. उपहारानंतर त्याने धवनच्या एकाच षटकात तीन, तर पंकज जैस्वालच्या एकाच षटकात पाच चौकार लगावत अवघ्या १०२ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील तिसरे आणि सलग दुसरे शतक होते. त्याला मागील दोन सामन्यांत १५४ आणि ९७ धावा करणार्‍या कर्णधार आदित्य तरेची उत्तम साथ लाभली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी १४३ भागीदारी रचली. अखेर तरेला ६२ धावांवर धवनने स्लिपमध्ये उभ्या काल्सीकरवी झेलबाद केले. सर्फराजने मात्र आपली चांगली फलंदाजी सुरुवात ठेवत द्विशतक झळकावले. तसेच त्याने शुभम रांजणेसह (नाबाद ४४) सहाव्या विकेटसाठी १५८ धावांची अभेद्य भागीदारी केली. त्यामुळे मुंबईचा संघ दिवसअखेर ५ बाद ३७२ असा सुस्थितीत होता.

संक्षिप्त धावफलक – मुंबई : पहिला डाव ५ बाद ३७२ (सर्फराज खान नाबाद २२६, आदित्य तरे ६२, शुभम रांजणे नाबाद ६२; वैभव अरोरा २/२८, राघव धवन २/८१) वि. हिमाचल प्रदेश.

- Advertisement -

इंगळेचे सहा बळी; महाराष्ट्राला आघाडी
महाराष्ट्राच्या मनोज इंगळेच्या भेदक मार्‍यामुळे रणजी सामन्यात त्रिपुराचा पहिला डाव अवघ्या १२१ धावांतच आटोपला. इंगळेने ३४ धावांतच ६ बळी घेतले. त्याला आशय पालकर आणि स्वप्नील गुगळे यांनी २-२ गडी बाद करत चांगली साथ दिली. त्रिपुराच्या १२१ धावांचे उत्तर देताना गुगळे (३४), कर्णधार अंकित बावणे (नाबाद ३९) आणि विशांत मोरे (नाबाद ३०) यांच्या संयमी फलंदाजीमुळे महाराष्ट्राची पहिल्या दिवसअखेर ५ बाद १२७ अशी धावसंख्या होती. त्यामुळे त्यांच्याकडे ६ धावांची आघाडी होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -