घरक्रीडासर्फराजचा ट्रीपल धमाका

सर्फराजचा ट्रीपल धमाका

Subscribe

रणजी करंडक स्पर्धेत उत्तर प्रदेश संघाच्या 8 बाद 625 धावांचा पाठलाग करताना मुंबईचे चार फलंदाज 128 धावांत तंबूत परतले होते. तेव्हा मुंबई पहिल्या डावातच पिछाडीवर पडेल, असे चित्र होते. पण, मुंबईच्या ताफ्यात पुन्हा रुजू झालेल्या सर्फराज खानने उत्तर प्रदेशच्या गोलंदाजांची चांगलीच दाणादाण उडवली. त्याच्या दमदार खेळीच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात आघाडीच नव्हे, तर तीन गुणांची कमाई केली. सर्फराजच्या आजच्या खेळीने 2009 साली रोहित शर्माने नोंदवलेल्ला विक्रमाच्या दिशेने कूच केली. त्याने कारकिर्दीतले पहिले त्रिशतक पूर्ण केले.

प्रथम फलंदाजी करताना उत्तर प्रदेश संघाने 159.3 षटके खेळून काढताना 8 बाद 625 धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर मैदानावर उतरलेल्या मुंबईचे पहिले दोन फलंदाज अवघ्या 16 धावांवर माघारी परतले. भुपेन लालवानी आणि हार्दिक तामोरे यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, भुपेन 43 धावांवर माघारी परतला. सिद्धेश लाड व हार्दिक यांची जोडी फार काळ टिकली नाही. हार्दिक 51 धावांवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर आलेल्या सर्फराजने उत्तर प्रदेशच्या सर्व स्वप्नांचा चुराडा केला. त्याने सिद्धेशसह 210 धावांची भागीदारी केली. सिद्धेश 98 धावांवर माघारी परतल्यानंतरही सर्फराजची फटकेबाजी कायम राहिली. त्यानं कर्णधार आदित्य तरेसोबतही दीडशतकी भागीदारी केली. तरेलाही शतक पूर्ण करता आले नाही आणि तो 97 धावांवर माघारी परतला. एस मुलानीसह त्याने मुंबईला 6 बाद 630 धावांपर्यंत मजल मारून देताना पहिल्या डावात आघाडी घेतली. सर्फराज 390 चेंडूंत 30 चौकार व 8 षटकार खेचून नाबाद 300 धावांवर आहे. त्याने खणखणीत षटकार खेचून अडीचशे धावांचा पल्ला सर केला. मुंबईकडून त्रिशतक झळकावणारा तो आठवा फलंदाज ठरला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -