Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IND vs AUS : भारताला आणखी एक झटका; जाडेजा कसोटी मालिकेतून बाहेर 

IND vs AUS : भारताला आणखी एक झटका; जाडेजा कसोटी मालिकेतून बाहेर 

फलंदाजी करताना जाडेजाच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली.

Related Story

- Advertisement -

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाला दुखापतींनी ग्रासले आहे. मोहम्मद शमी, उमेश यादव यांसारख्या भारताच्या खेळाडूंना दुखापतीमुळे कसोटी मालिकेत मध्यातूनच माघार घ्यावी लागली होती. आता भारताला आणखी एक झटका बसला असून अष्टपैलू रविंद्र जाडेजा उर्वरित तिसरी कसोटी आणि १५ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या चौथ्या कसोटीला मुकणार आहे. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी येथे तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी फलंदाजी करताना जाडेजाच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यामुळे तो उर्वरित कसोटी मालिकेत खेळू शकणार नाही. तसेच भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतच्या हाताला दुखापत झाली होती. मात्र, तो दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याची शक्यता आहे.

जाडेजा आणि पंत यांना ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी बाऊंसर्स टाकून अडचणीत टाकले. या दोघांना दुखापत झाल्यावर त्यांना स्कॅनसाठी पाठवण्यात आले होते. ‘रविंद्र जाडेजाच्या डाव्या अंगठ्याला फ्रॅक्चर आहे. त्यामुळे त्याला ग्लोव्हज घालणे आणि फलंदाजी करणे अवघड जाणार आहे. त्याला दोन-तीन आठवडे मैदानाबाहेर रहावे लागणार असल्याने तो चौथ्या कसोटीत खेळू शकणार नाही. पंतची दुखापत फार गंभीर नाही. त्यामुळे तो दुसऱ्या डावात फलंदाजी करू शकेल,’ असे बीसीसीआयच्या सूत्रांनी शनिवारी सांगितले. जाडेजाने सध्या सुरु असलेल्या सिडनी कसोटीच्या पहिल्या डावात अष्टपैलू खेळ केला होता. त्याने ४ विकेट घेताना फलंदाजीत नाबाद २८ धावा केल्या होत्या.

- Advertisement -