घरIPL 2020पुन्हा ये रे माझ्या मागल्या!

पुन्हा ये रे माझ्या मागल्या!

Subscribe

यंदा युएईत होत असलेल्या आयपीएलच्या तेराव्या मोसमामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ जेतेपदाचे खाते उघडेल अशी चाहत्यांना आशा होती. त्यांनी या मोसमाची दमदार सुरुवात करताना १० पैकी ७ सामने जिंकले होते. मात्र, मोक्याच्या क्षणी या संघाचा खेळ खालावला. त्यांनी अखेरचे चारही साखळी सामने गमावले. तसेच एलिमिनेटरच्या सामन्यात हैदराबादने त्यांच्यावर मात केली. त्यामुळे कोहलीच्या संघाला पुन्हा एकदा जेतेपदाने हुलकावणी दिली.

आयपीएल ही जगातील सर्वात लोकप्रिय स्पर्धा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) हा या स्पर्धेतील सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक! आयपीएल स्पर्धेच्या यशामागे आणि लोकप्रियतेमागे एक प्रमुख कारण म्हणजे ‘स्टार पॉवर’. जगभरातील इतर टी-२० स्पर्धांमध्ये खेळो वा ना खेळो, पण सर्वच देशांचे प्रमुख आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आयपीएलमध्ये आवर्जून खेळतात. आयपीएलच्या आठही संघांमध्ये नामवंत भारतीय आणि परदेशी खेळाडू असतात. मात्र, काही खेळाडूंवर चाहत्यांचे विशेष प्रेम असते आणि त्यामुळे या संघांची लोकप्रियता वाढते.

लोकप्रियतेच्या शर्यतीत मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ अव्वल तीन स्थानांवर आहेत असे म्हणणे वावगे ठरू नये. मुंबईला रोहित शर्मा, किरॉन पोलार्ड, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह यांसारखे खेळाडू लाभले आहेत. चेन्नईकडे महेंद्रसिंग धोनीसारखा हुकमी एक्का आहे, तर बंगळुरूच्या संघात विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, युजवेंद्र चहल या खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे चाहत्यांचे इतर संघांपेक्षा या तीन संघांवर अधिक लक्ष असणार हे स्वाभाविकच आहे. परंतु, या तीन संघांमध्ये एक मोठा आणि महत्वाचा फरक आहे.

- Advertisement -

मुंबई आणि चेन्नई हे दोन संघ लोकप्रिय तर आहेतच, पण तितकेच यशस्वी आहेत. रोहितच्या नेतृत्वात मुंबईने विक्रमी चार वेळा आणि धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने तीन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. लोकप्रितेत कोहलीचा बंगळुरू संघ मुंबई आणि चेन्नईला ‘कांटे की टक्कर’ देत असला, तरी जेतेपदांच्या बाबतीत हा संघ बराच मागे आहे. बंगळुरूच्या संघाला अजून एकदाही आयपीएल स्पर्धा जिंकता आलेली नाही.

यंदा युएईत होत असलेल्या आयपीएलच्या तेराव्या मोसमात बंगळुरूचा संघ जेतेपदाचे खाते उघडेल अशी चाहत्यांना आशा होती. बंगळुरूला जेतेपद पटकावण्यासाठी प्रबळ दावेदारही मानले जात होते. त्यांनी या मोसमाची दमदार सुरुवात करताना १० पैकी ७ सामने जिंकले होते. मात्र, पुन्हा एकदा मोक्याच्या क्षणी या संघाचा खेळ खालावला. त्यांनी अखेरचे चारही साखळी सामने गमावले. परंतु, सुरुवातीच्या सामन्यांत केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्यांनी प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला.

- Advertisement -

एलिमिनेटरच्या सामन्यात त्यांच्यासमोर आव्हान होते ते फॉर्मात असलेल्या सनरायजर्स हैदराबादचे. या सामन्यात पराभव म्हणजे संघ स्पर्धेतून आऊट! ‘करो या मरो’च्या या सामन्यात बंगळुरूचे खेळाडू त्यांचा खेळ उंचावतात का? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले होते. कर्णधार कोहली पुढे येऊन संघाचे नेतृत्व करण्यासाठी ओळखला जातो. यंदा संपूर्ण स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर खेळलेला कोहली हैदराबादविरुद्ध मात्र सलामीला आला. त्याचा हा निर्णय बहुधा चुकलाच. केवळ सहा धावा केल्यावर कोहलीला जेसन होल्डरने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मधल्या फळीत एबी डिव्हिलियर्स अनेकदा बंगळुरूचा तारणहार ठरला आहे. या सामन्यातही त्याने अर्धशतकी खेळी केली आणि त्यामुळे बंगळुरूने १३१ अशी सन्मानजनक धावसंख्या उभारली.

गोलंदाजी ही वर्षानुवर्षे बंगळुरूच्या संघाची कमकुवत बाजू मानली जाते. लेगस्पिनर युजवेंद्र चहल आणि त्यातल्या त्यात वेगवान गोलंदाज नवदीप सैनी वगळता, बंगळुरूचे गोलंदाज योग्य टप्प्यावर मारा करण्यात अपयशी ठरतात अशी टीका होते. या सामन्यात मात्र बंगळुरूच्या गोलंदाजांनी हैदराबादला चांगलेच झुंजवले. मात्र, दबावात केन विल्यमसन आणि जेसन होल्डर या आंतरराष्ट्रीय कर्णधारांनी त्यांचा खेळ उंचावत हैदराबादला अखेरच्या षटकात सामना जिंकवून दिला.

या पराभवामुळे कोहलीच्या बंगळुरू संघाचे यंदाच्या मोसमातील आव्हान संपुष्टात आले आणि पुन्हा एकदा त्यांना जेतेपदाने हुलकावणी दिली. कोहली हा भारताच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. मात्र, त्याची जादू आयपीएल स्पर्धेत काही चालत नाही. कोहलीची २०१३ मोसमाआधी कर्णधारपदी निवड झाली होती. त्याच्या नेतृत्वात बंगळुरूने आठ मोसमांत केवळ तीनदा प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला आहे. त्यातच मागील चार पैकी दोन मोसमात हा संघ गुणतक्त्यात तळाला होता. त्यामुळे आता कोहलीलाच कर्णधारपदी कायम ठेवायचे का? हा बंगळुरूपुढे मोठा प्रश्न आहे.

बंगळुरूसाठी यंदा बऱ्याच सकारात्मक गोष्टी घडल्या. फलंदाज म्हणून कोहली, तसेच एबी डिव्हिलियर्स यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली. देवदत्त पडिक्कलच्या रूपात त्यांना युवा, प्रतिभावान सलामीवीर मिळाला. तसेच गोलंदाजांच्या कामगिरीतही सुधारणा पाहायला मिळाली. मात्र, मधल्या फळीचा तिढा अजूनही कायम आहे. कोहली, एबी लवकर बाद झाले तर काय? हा बंगळुरूपुढे नेहमीच प्रश्न असतो. त्याचे यंदाही उत्तर मिळाले नाहीच. तसेच एबी वगळता परदेशी खेळाडूंच्या कामगिरीत सातत्य नव्हते. त्यामुळे बंगळुरूच्या संघाला पुढील मोसमात जेतेपदाचा दुष्काळ संपवायचा असल्यास या काही प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार आहेत.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -