रिचर्ड्स टी-२० क्रिकेटमध्ये सुपरस्टार खेळाडू असते!

इयन स्मिथ यांचे मत

Mumbai
व्हिव्ह रिचर्ड्स

वेस्ट इंडिजचे महान फलंदाज व्हीव रिचर्ड्स टी-२० क्रिकेटमध्येही सुपरस्टार खेळाडू असते. टी-२० फ्रेंचायझींनी त्यांच्यासाठी बेन स्टोक्स आणि पॅट कमिन्स यांच्यापेक्षाही जास्त किंमत मोजली असती, असे मत न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू इयन स्मिथ यांनी व्यक्त केले. रिचर्ड्स हे क्रिकेट इतिहासातील सर्वात विस्फोटक फलंदाजांपैकी एक मानले जातात. ज्या काळात ७०-७५ चा स्ट्राईक रेटही अप्रतिम मानला जात होता, त्यावेळी रिचर्ड्स यांनी १८७ एकदिवसीय सामन्यांत ९०.२० च्या स्ट्राईक रेटने ६७२१ धावा केल्या होत्या. त्यामुळे टी-२० क्रिकेटमध्ये ते खूप यशस्वी झाले असते असा स्मिथ यांना विश्वास आहे.

व्हीव रिचर्ड्स हे कोणत्याही काळात, क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात आक्रमक शैलीतच खेळले असते याची मला खात्री आहे. ते ज्या काळात खेळले, तेव्हा त्यांच्या आणि इतर फलंदाजांच्या स्ट्राईक रेटमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. ते त्या काळातही जणू टी-२० क्रिकेट खेळत होते. रिचर्ड्स टी-२० क्रिकेटमध्येही सुपरस्टार खेळाडू असते.

टी-२० फ्रेंचायझींनी त्यांच्यासाठी बेन स्टोक्स आणि पॅट कमिन्स यांना मिळून मिळालेल्या किमतीपेक्षाही जास्त किंमत मोजली असती. कारण, त्यांच्यामुळे अधिक प्रेक्षक सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आले असते. तसेच लोक त्यांची फलंदाजी पाहण्यासाठी टीव्हीला चिकटून बसले असते. मी त्यांच्याइतका विस्फोटक फलंदाज पाहिलेला नाही. ते फलंदाजीला आल्यावर गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक घाबरायचे, असे इयन स्मिथ म्हणाले.