IPL 2020 : रिषभ पंतला दुखापत; किमान एक आठवडा स्पर्धेबाहेर

राजस्थानविरुद्धच्या सामन्यात पंतच्या पायाला दुखापत झाली.

rishabh pant
रिषभ पंत

दिल्ली कॅपिटल्स संघाला यंदाची आयपीएल स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. दिल्लीच्या संघाने मोसमाची चांगली सुरुवात करताना सात पैकी पाच सामने जिंकले. दिल्लीच्या या विजयांमध्ये यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतने महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, रविवारी झालेल्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात पंत दुखापतीमुळे खेळू शकला नाही आणि दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थान रॉयल्सविरुद्ध मागील शुक्रवारी झालेल्या सामन्यात पंतच्या पायाला दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्याला किमान एक आठवडा मैदानाबाहेर राहावे लागणार असल्याचे दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितले.

आम्हाला अजून कल्पना नाही

पंत पुन्हा केव्हा उपलब्ध होईल हे सांगणे अवघड आहे. आम्हाला अजून याबाबत कल्पना नाही. मात्र, आमच्या संघाच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याला किमान एक आठवडा विश्रांती करावी लागणार आहे. त्यामुळे तो सामने खेळू शकणार नाही. मात्र, तो दमदार पुनरागमन करेल अशी मला आशा असल्याचे अय्यर मुंबईविरुद्धच्या सामन्यानंतर म्हणाला. पंतने यंदाच्या मोसमात आतापर्यंत ६ सामन्यांत ३५ च्या सरासरीने १७६ धावा केल्या आहेत.

धावसंख्या पुरेशी नव्हती

मुंबईने रविवारी झालेला सामना ५ विकेट राखून जिंकला. दिल्लीने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १६२ अशी धावसंख्या उभारली होती. मात्र, या खेळपट्टीवर ही धावसंख्या पुरेशी नव्हती असे अय्यरला वाटले. आम्ही १०-१५ धावा कमी केल्या. आम्हाला १७०-१७५ धावा करण्यात यश आले असते, तर निकाल कदाचित वेगळा लागला असता. स्टोइनिस आणखी काळ खेळपट्टीवर टिकला पाहिजे होता. तो चांगली फलंदाजी करत आहे. मात्र, तो चुकीच्या क्षणी धावचीत झाला, असे अय्यरने सांगितले.