घरक्रीडारोहितला एकदिवसीय संघाचे कर्णधारपद?

रोहितला एकदिवसीय संघाचे कर्णधारपद?

Subscribe

विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्धचा सामना गमावल्यामुळे भारताचे आव्हान संपुष्टात आले. विराट कोहलीच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने मागील काही वर्षांत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यामुळे ते हा विश्वचषक जिंकण्याचे प्रबळ दावेदार होते. मात्र, त्यांना अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आले. त्यामुळे आता बीसीसीआय कोहलीचे एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि तसे झाल्यास उपकर्णधार रोहित शर्माच्या खांद्यावर कर्णधापदाची धुरा सोपवण्यात येण्याची शक्यता आहे.

बीसीसीआयचा एक अधिकारी याबाबत म्हणाला की, सर्व चांगले संघ एक विश्वचषक संपल्यावर लगेचच पुढील विश्वचषकाच्या तयारीला लागतात. इंग्लंड याचे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी मागील विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीनंतर यंदाच्या विश्वचषकाची तयारी सुरु केली आणि त्यांना विश्वविजेतेपद मिळाले. त्यामुळे आता भारतीय संघानेही काही बदल केले तर आश्चर्य वाटायला नको.

- Advertisement -

भारत रोहितला एकदिवसीय संघाचे कर्णधारपद देण्याबाबत विचार करू शकेल आणि विराट कसोटी, टी-२० संघाचा कर्णधार म्हणून कायम राहिल. माझ्या मते रोहितला एकदिवसीय संघाचे कर्णधारपद देण्याची ही योग्य वेळ आहे. आताच्या कर्णधाराला संघ व्यवस्थापन आणि खेळाडूंचा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र, पुढील विश्वचषकाच्या दृष्टीने नवा कर्णधार संघासाठी फायदेशीर ठरू शकेल आणि रोहित यासाठी योग्य पर्याय आहे असे मला वाटते.

सलामीवीर रोहितने यंदाच्या विश्वचषकात अप्रतिम कामगिरी केली. त्याने विक्रमी ५ शतकांसह विश्वचषकात सर्वाधिक धावा केल्या. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे यशस्वी नेतृत्त्व करणार्‍या रोहितने १० एकदिवसीय सामन्यांत भारताचे कर्णधारपद भूषवले आहे. यापैकी ८ सामने भारताने जिंकले आहेत. मागील वर्षी कोहलीच्या अनुपस्थितीत रोहितच्या नेतृत्त्वात भारताने आशिया चषकाचे जेतेपद पटकावले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -