Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा रोहित-मयांकची कामगिरी भारतासाठी फायदेशीर!

रोहित-मयांकची कामगिरी भारतासाठी फायदेशीर!

Related Story

- Advertisement -

एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्‍या भारताच्या रोहित शर्माला कसोटी क्रिकेटमध्ये फारसे यश मिळत नव्हते. त्यामुळे नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला पहिल्यांदा सलामीला येण्याची संधी मिळाली. त्याने या संधीचे सोने करताना ३ सामन्यांच्या ४ डावांत १३२.२५ च्या सरासरीने ५२९ धावा केल्या. त्याचा सलामीचा साथी मयांक अगरवालने या मालिकेत ३४० धावा करताना एक शतक आणि एक द्विशतक लगावले. या दोघे पुढेही अशीच कामगिरी करत राहतील अशी भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजाराला आशा आहे. तसेच या सलामीवीरांची कामगिरी भारतासाठी फायदेशीर आहे, असे पुजाराला वाटते.

सलामीवीर जेव्हा उत्तम कामगिरी करतात, तेव्हा संघाचा खूप फायदा होतो. खासकरून कसोटी क्रिकेटमध्ये संघाला चांगली सुरुवात मिळणे आवश्यक असते. रोहित आणि मयांकने नुकत्याच झालेल्या मालिकेत आम्हाला अप्रतिम सुरुवात करून दिली. कसोटी सामन्यात चांगली सुरुवात मिळाल्यावर संघ मोठी धावसंख्या उभारणार हे जवळपास निश्चित होते. मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरले तरीही संघ सहजपणे ३५०-४०० धावा करू शकतो. या दोघांची कामगिरी आमच्यासाठी फायदेशीर ठरत आहे, असे पुजारा म्हणाला.

- Advertisement -

भारतीय संघ आता लवकरच आपला पहिला डे-नाईट कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी कशाप्रकारे तयारी करत आहेस असे विचारले असता पुजाराने सांगितले, संध्याकाळच्या वेळी गुलाबी चेंडूचा सामना करणे आव्हानात्मक असते. त्यामुळे या सामन्यासाठी विशेषतः संध्याकाळी सराव करणे गरजेचे आहे. सतत गुलाबी चेंडूचा सामना करण्याचा सराव केल्यास सामन्यात खेळणे सोपे होईल.

- Advertisement -