IND vs AUS : रोहित शर्माच्या कसोटी कामगिरीत सुधारणा गरजेची – मॅकग्रा

रोहितला ३२ कसोटीत केवळ सहा शतके करता आली आहेत. 

rohit sharma
रोहित शर्मा

फिटनेसबाबत प्रश्नचिन्ह असल्याने सलामीवीर रोहित शर्माची आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली नव्हती. रोहितच्या पायाला दुखापत झाली होती. मात्र, कसोटी मालिकेआधी तो पूर्णपणे फिट होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे रोहितला एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली असली तरी कसोटी मालिकेसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली पितृत्व रजेवर जाणार असून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील केवळ एका सामन्यानंतर मायदेशी परतणार आहे. कोहलीच्या अनुपस्थितीत रोहितला अधिक जबाबदारीने खेळावे लागणार आहे, असे ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राला वाटते.

रोहित शर्मा फारच उत्कृष्ट फलंदाज आहे. मात्र, त्याला अजून कसोटी क्रिकेटमध्ये अपेक्षित यश मिळालेले नाही. माझ्या मते, रोहितच्या कसोटी कामगिरीत सुधारणा गरजेची आहे. विराट कोहली मायदेशी परतल्यानंतर रोहितला अधिक जबाबदारीने खेळावे लागेल. मात्र, तुम्ही केवळ एका फलंदाजाचा विचार करू शकत नाही. भारताकडे अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल असे बरेच अप्रतिम फलंदाज आहे. भारताची फलंदाजांची फळी मजबूत आहे. कोहलीच्या अनुपस्थितीत इतर फलंदाजांना स्वतःचा खेळ उंचावत भारताला सामने जिंकवून देण्याची संधी मिळणार आहे. या संधीचा रोहित फायदा घेऊ शकेल, असे मॅकग्रा म्हणाला.

रोहितची मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना होते. परंतु, कसोटी क्रिकेटमध्ये त्याला ३२ सामन्यांत केवळ ६ शतके करता आली आहेत. त्याने मागील वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत पहिल्यांदा सलामीवीर म्हणून खेळताना दोन शतके आणि एक द्विशतक केले होते. परंतु, मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील दोन कसोटीत रोहितने केवळ १०६ धावाच केल्या होत्या. यंदा या कामगिरीत सुधारणा करण्याचा त्याचा प्रयत्न असेल.