रोहित शर्मा भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार असला पाहिजे – गंभीर 

पाच वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावणारा रोहित हा एकमेव कर्णधार आहे.

रोहित शर्मा

रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने यंदा पाचव्यांदा आणि सलग दुसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले. मुंबईने अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर मात केली. कर्णधार रोहितने ६८ धावांची खेळी करत मुंबईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच त्याने कर्णधार म्हणूनही पुन्हा एकदा सर्वांना प्रभावित केले. पाच वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावणारा रोहित हा एकमेव कर्णधार आहे. याऊलट विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला अजून एकदाही आयपीएल स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्यामुळे आता रोहितला भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार बनवण्याची वेळ आली आहे, असे गौतम गंभीरला वाटते.

 रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार नसणे, यात भारताचे नुकसान आहे, रोहितचे नाही. जितका चांगला संघ, तितका चांगला कर्णधार असे म्हटले जाते आणि मला हे मान्य आहे. परंतु, मग कोणता कर्णधार चांगला आणि कोणता कर्णधार वाईट, हे ठरवायचे कसे? रोहितने त्याच्या संघाला पाच वेळा आयपीएलचे जेतेपद मिळवून दिले आहे. तो आणखी काय करू शकतो? महेंद्रसिंग धोनी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असल्याचे आपण म्हणतो. का? कारण, त्याच्या नेतृत्वात भारताने दोन विश्वचषक आणि चेन्नईने तीन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. मात्र, रोहितने पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली असून तो या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्यामुळे आता रोहितची भारताच्या टी-२० संघाच्या कर्णधारपदी निवड न होणे, ही निराशाजनक गोष्ट असेल, असे गंभीर म्हणाला.