घरक्रीडारोहितचा कसोटीत सलामीवीर म्हणून विचार होणार!

रोहितचा कसोटीत सलामीवीर म्हणून विचार होणार!

Subscribe

निवड समिती अध्यक्ष प्रसाद यांचे विधान

भारताचा सलामीवीर लोकेश राहुलला मागील काही काळात कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. त्याला संघातून वगळण्यातही आले होते. मात्र, उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळल्यामुळे युवा पृथ्वी शॉवर आठ महिन्यांची बंदी घालण्यात आली आणि राहुलचे कसोटी संघात पुनरागमन झाले. परंतु, त्याने सप्टेंबर २०१८ नंतर कसोटी क्रिकेटमध्ये एकही अर्धशतक झळकावलेले नाही. त्यामुळे त्याच्या फॉर्मची बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष एम.एस.के प्रसाद यांना चिंता आहे. तसेच मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून अप्रतिम कामगिरी करणार्‍या रोहित शर्माचा कसोटी क्रिकेटमध्येही सलामीवीर म्हणून विचार केला जाईल, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले.

निवड समितीच्या सदस्यांची वेस्ट इंडिज दौर्‍यानंतर बैठक झालेली नाही. मात्र, आमची जेव्हा बैठक होईल, तेव्हा आम्ही रोहितला कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून खेळवण्याबाबत नक्कीच विचार करू. राहुल हा प्रतिभावान खेळाडू आहे. त्याला सध्या कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्यात अपयश येत आहे. आम्हाला त्याच्या फॉर्मची नक्कीच चिंता आहे. त्याला खेळपट्टीवर काही काळ घालवण्याची आवश्यकता आहे, असे प्रसाद म्हणाले.

- Advertisement -

नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतील २ सामन्यांत राहुलला १०१ धावाच करता आल्या. रोहितला या मालिकेत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. रोहित कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत मधल्या फळीतच खेळला आहे. मात्र, त्याला फारसे यश मिळालेले नाही. विंडीजविरुद्ध अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी या मधल्या फळीतील फलंदाजांनी अप्रतिम प्रदर्शन केल्याने रोहितला आगामी मालिकांमध्ये मधल्या फळीत संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

परंतु, रोहितसारख्या खेळाडूला संघातून बाहेर ठेवणे योग्य नसल्याने, त्याला कसोटीत सलामीवीर म्हणून खेळावले पाहिजे, असे काही दिवसांपूर्वी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणाला होता. मात्र, भारताचा महान फिरकीपटू अनिल कुंबळे गांगुलीच्या मताशी सहमत नव्हता. ज्या सलामीवीरांनी स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे, त्यांना भारतीय संघात संधी मिळाली पाहिजे, असे कुंबळेला वाटते.

- Advertisement -

युवकांना संधी देण्याचा प्रयत्न!

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या अनुभवी फिरकीपटूंचा भारतीय संघात समावेश नाही. त्यांच्या जागी राहुल चहर आणि वॉशिंग्टन सुंदर या युवा फिरकीपटूंना संधी देण्यात आली आहे. हे दोघे विंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेतही खेळले. याबाबत प्रसाद यांनी सांगितले, पुढील वर्षी होणारा टी-२० विश्वचषक लक्षात घेऊन आम्ही युवा खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न करत आहोत. कुलदीप आणि चहल या दोघांनी मागील २ वर्षांत अप्रतिम कामगिरी केली आहे. मात्र, आम्हाला इतर युवा खेळाडू कशी कामगिरी करतात, हे पाहायचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -