घरक्रीडासचिन तेंडुलकरचा लॉरेस क्रीडा पुरस्काराने गौरव!

सचिन तेंडुलकरचा लॉरेस क्रीडा पुरस्काराने गौरव!

Subscribe

 २०११ विश्वचषकातील तो क्षण ठरला सर्वोत्तम

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात २०११ मध्ये घरच्या मैदानावर झालेला विश्वचषक जिंकण्याची किमया भारताने साधली होती. भारताला दुसर्‍यांदा विश्वविजेतेपद मिळवण्यासाठी तब्बल २८ वर्षे वाट पाहावी लागली होती. हा विजय सचिन तेंडुलकरसाठी आहे, असे सामन्यानंतर भारतीय खेळाडू म्हणाले. तसेच मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये झालेला अंतिम सामना संपल्यावर इतर खेळाडूंनी सचिनला आपल्या खांद्यावर उचलत स्टेडियमची फेरी मारली. तो क्षण भारतीय चाहते कधीही विसरू शकणार नाही. आता याच क्षणासाठी सचिनला लॉरेस क्रीडा पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. २००० ते २०२० या वीस वर्षांमध्ये क्रीडा विश्वातला हा सर्वोत्तम क्षण ठरला आहे. या पुरस्कारासाठी सचिनसह जगभरातील २० जणांना नामांकन होते.

सचिन हा भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून ओळखला जातो. २०११ मध्ये सचिन आपला सहावा आणि अखेरचा विश्वचषक खेळत होता. या स्पर्धेचा अंतिम सामना सचिनचे घरचे मैदान असणार्‍या वानखेडेवर झाला, ज्यात भारताने श्रीलंकेवर ६ विकेट राखून मात केली. भारताला जिंकण्यासाठी ११ चेंडूत ४ धावांची गरज असताना कर्णधार धोनीने नुवान कुलसेकराच्या चेंडूवर षटकार लगावत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर भारताच्या सर्व खेळाडूंनी मैदानात धावत येत जल्लोष केला आणि सचिनला आपल्या खांद्यावर उचलत स्टेडियमची फेरी मारली. लॉरेस पुरस्कारांमध्ये त्या क्षणाला कॅरिड ऑन द शोल्डर ऑफ अ नेशन असे शीर्षक देण्यात आले होते. चाहत्यांनी भरघोस मतदान करत याला मागील वीस वर्षांतील क्रीडा विश्वातला सर्वोत्तम क्षण ठरवले. बर्लिनमध्ये पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्याला सचिन स्वतः उपस्थित होता. त्याला ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार स्टिव्ह वॉ आणि माजी टेनिसपटू बोरिस बेकरच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

- Advertisement -

खेळांमध्ये किती ताकद असते हे यावरुन कळते!

विश्वचषक जिंकल्यानंतरच्या भावना शब्दांत मांडणे अवघड आहे. एखादे यश संपूर्ण देश साजरा करतो असे क्वचितच होते. खेळांमध्ये किती ताकद असते आणि खेळांमुळे जीवनात कसे सकारात्मक बदल घडवू शकतात, हे यावरूनच कळते, असे मागील वीस वर्षांतील लॉरेस बेस्ट स्पोर्टींग मोमेन्ट हा पुरस्कार स्वीकारताना सचिन म्हणाला. नेल्सन मंडेला म्हणाले होते की खेळ आपल्याला एकत्र आणतो. मंडेला यांचा तो संदेश मला कायम लक्षात राहिला आहे, असेही सचिनने नमूद केले. तसेच त्याने पुढे सांगितले, १९८३ मध्ये वयाच्या १० व्या वर्षी माझ्या क्रिकेटच्या प्रवासाला सुरुवात झाली. भारताने विश्वचषक जिंकला होता. मला त्यावेळी त्याचे महत्त्व माहित नव्हते. सगळे जल्लोष करत होते म्हणून मीसुद्धा करु लागलो. मात्र, देशासाठी काहीतरी खास झाले आहे हे मला कळले होते. मलाही एकेदिवशी हा अनुभव घ्यायचा होता आणि तेव्हाच माझा प्रवास सुरु झाला. २०११ मध्ये विश्वचषक जिंकणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात गौरवास्पद क्षण होता. विश्वचषक हातात घेण्यासाठी मला २२ वर्षे वाट पाहावी लागली, पण मी कधीही आशा सोडली नव्हती.

हॅमिल्टन, मेस्सी सर्वोत्तम!

बार्सिलोनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि फॉर्म्युला वन ड्रायव्हर लुईस हॅमिल्टनला लॉरेस सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा पुरस्कार मिळाला. महिलांमध्ये अमेरिकेची जिम्नॅस्ट सिमोन बाईल्स वर्षातील सर्वोत्तम खेळाडू ठरली. मेस्सीने मागील वर्षी सर्वोत्तम फुटबॉलपटूला मिळणारा बॅलन डी ओर पुरस्कार विक्रमी सहाव्यांदा पटकावला होता. मेस्सीच्या बार्सिलोना संघाने मागील मोसमात स्पेनमधील व्यावसायिक फुटबॉल स्पर्धा ला लिगाचे जेतेपद पटकावले होते. त्याने या स्पर्धेच्या ३४ सामन्यांत सर्वाधिक ३६ गोल केले. दुसरीकडे ब्रिटनच्या हॅमिल्टनने मर्सिडीजचे प्रतिनिधित्व करताना सहाव्यांदा फॉर्म्युला वनचे जेतेपद मिळवले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -