घरक्रीडासिंधूच्या विक्रमी कामगिरीने साई प्रणितचे यश झाकोळले!

सिंधूच्या विक्रमी कामगिरीने साई प्रणितचे यश झाकोळले!

Subscribe

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने मागील महिन्यात झालेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी ती भारताची पहिलीच बॅडमिंटनपटू होती. या कामगिरीमुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. याच स्पर्धेत पुरुषांमध्ये भारताच्या साई प्रणितने कांस्यपदक मिळवले होते. जागतिक स्पर्धेत पदक मिळवणारा प्रणित हा ३६ वर्षांत पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू होता. मात्र, सिंधूच्या विक्रमी कामगिरीने साई प्रणितचे यश काहीसे झाकोळले, असे मत भारताचे राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी व्यक्त केले.

साईने जागतिक स्पर्धेत फारच उल्लेखनीय कामगिरी केली. सिंधूच्या विक्रमी कामगिरीने साईचे यश काहीसे झाकोळले. मात्र, इतक्या वर्षांनंतर भारताच्या पुरुष बॅडमिंटनपटूने जागतिक स्पर्धेत पदक मिळवणे ही खास गोष्ट होती. मला आशा आहे की साई पुढेही अशीच कामगिरी करत राहील. सिंधू आणि साई यांची फक्त कामगिरी खास होती असे नाही, तर हे दोघेही ज्यापद्धतीने खेळले आणि सामने जिंकले, त्याचा मला विशेष आनंद होता. या दोघांचे कौतुक करावे तितके कमी आहे, असे गोपीचंद म्हणाले.

- Advertisement -

ती बर्‍याच स्पर्धा जिंकेल!

सिंधूने २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावले होते. त्यानंतरही तिला बर्‍याच स्पर्धांमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मात्र, आता ती यापुढे उत्तम कामगिरी करून स्पर्धा जिंकत राहील अशी गोपीचंद यांना आशा आहे. सिंधू कमी वयातच खूप यश मिळवेल याची मला खात्री होती.जे लोक मला ओळखतात त्यांना माहीत आहे की, २०१०-११ मध्येच मी सिंधूमध्ये महान खेळाडू होण्याची क्षमता आहे असे म्हणालो होतो. तिने आतापर्यंत फारच अप्रतिम प्रदर्शन केले आहे. तिचा मला अभिमान आहे. सिंधू फक्त २४ वर्षांची आहे. त्यामुळे ती अजून बरीच वर्षे खेळेल. मला आशा आहे की, ती कारकिर्दीच्या अखेरपर्यंत बर्‍याच स्पर्धा जिंकेल, असे गोपीचंद म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -