प्रकाश पदुकोण अकादमीत येण्याचा निर्णय सायनाचाच!

अकादमीचे स्पष्टीकरण

प्रकाश पदुकोण यांनी सायना नेहवालला माझी अकादमी सोडण्यास प्रोत्साहन दिले होते, असे भारताचे राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी आपल्या लवकरच प्रकाशित होणार्‍या पुस्तकात लिहिले आहे. भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायनाने २०१४ सालच्या जागतिक स्पर्धेनंतर गोपीचंद अकादमी सोडून बंगळुरू येथील पदुकोण अकादमीत सराव करण्यास सुरुवात केली. मात्र, पदुकोण अकादमीत येण्याचा निर्णय हा पूर्णपणे सायनाचाच होता, असे स्पष्टीकरण अकादमीकडून देण्यात आले आहे.

बंगळुरुतील प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमी येऊन सराव करण्याचा निर्णय पूर्णपणे सायनाचाच होता. मात्र, प्रशिक्षक विमल कुमार यांच्या मार्गदर्शनामुळे तिला पुन्हा सूर गवसला. तिने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली. तिला ऑल इंग्लंड स्पर्धा आणि जागतिक स्पर्धेत रौप्यपदक मिळवण्यात यश आले होते, असे पदुकोण अकादमीने स्पष्टीकरण देताना म्हटले.

प्रकाश सर माझ्याविषयी कधीच काही चांगले बोलत नाहीत आणि यामागचे कारण मला अजूनही माहित नाही, असेही गोपीचंद यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे. मात्र, प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीने गोपीचंद यांचे कौतुक केले. गोपीचंद यांनी आधी खेळाडू आणि नंतर प्रशिक्षक म्हणून भारतीय बॅडमिंटनला जे योगदान दिले आहे, त्याचा प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीला आदर आहे. भारतीय खेळाडूंच्या यशात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांचे आणि आमचे खूप चांगले संबंध आहेत, असे अकादमीकडून सांगण्यात आले.