सैनी, प्रसिधने केले प्रभावित – ब्रेट ली

Mumbai
ब्रेट ली

भारतीय गोलंदाजांनी मागील काही वर्षांत खूपच दमदार कामगिरी केली आहे. जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव या गोलंदाजांच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे भारताने परदेशातही कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकल्या आहेत. त्यातच भारताच्या राखीव फळीतही खूपच चांगले युवा गोलंदाज आहेत, जे भारत ’अ’ संघासाठी चांगले प्रदर्शन करत आहेत. प्रसिध कृष्णा आणि नवदीप सैनी हे दोन गोलंदाज मागील १-२ वर्षांत खूप चांगली कामगिरी केली आहेत. त्यांनी यंदाच्या आयपीएलमध्येही चांगल्या वेगाने गोलंदाजी करत सर्वांनाच आपला चाहता बनवले आहे. एकेकाळी जगातील सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणार्‍या ब्रेट लीलाही या दोघांनी प्रभावित केले आहे.

भारतीय गोलंदाजांविषयी ली म्हणाला, मला बरेच भारतीय गोलंदाज आवडतात. जसप्रीत बुमराह हा खूपच उत्कृष्ट गोलंदाज आहे. तो चांगल्या वेगाने गोलंदाजी करतो आणि त्याची गोलंदाजीची शैली (अ‍ॅक्शन) वेगळी आहे. प्रसिध कृष्णा यंदाच्या आयपीएलमध्ये सातत्याने १४५ च्या वेगाने गोलंदाजी करतो आहे. नवदीप सैनीनेही मला खूप प्रभावित केले आहे. या दोघांमध्ये खूप प्रतिभा आहे. त्यांची गोलंदाजीची शैली चांगली आहे. मला असे वाटते की त्यांनी शैली आणि फॉलो थ्रूमध्ये थोडासा बदल केला, तर त्यांचा वेग अजून वाढू शकेल. सध्याचे भारतीय गोलंदाज चांगल्या वेगाने गोलंदाजी करतात, हे पाहून बरे वाटले. भारताकडे सध्या खूप चांगले गोलंदाज आहेत आणि त्यामुळेच त्यांना विश्वचषक जिंकण्याची संधी आहे.

१३०-१३५ हा चांगला वेग नाही

आपल्याला सर्वांनाच माहित आहे की १३०-१३५ या वेगाने गोलंदाजी करणार्‍या गोलंदाजाला वेगवान गोलंदाज म्हणता येणार नाही, त्याला मध्यम गती गोलंदाज म्हणायला पाहिजे. १४५ पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करू शकतो, तो खरा वेगवान गोलंदाज. भारताकडे या वेगाने गोलंदाजी करतात असे गोलंदाज आहेत आणि ही त्यांच्यासाठी आनंदाची बाब आहे, असे ब्रेट ली म्हणाला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here