घरक्रीडासानिया मिर्झावरील टीका निरर्थक

सानिया मिर्झावरील टीका निरर्थक

Subscribe

भारत आणि पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघांमधील सामना म्हटले की दोन्ही देशांमधील चाहत्यांमध्ये प्रचंड वादविवाद असतो. त्यातच जो संघ पराभूत होईल, त्याच्यावर टीकेची झोड उठते. विश्वचषकात मागील रविवारी या दोन देशांमध्ये सामना झाला, ज्यात भारताने बाजी मारली. सामना संपल्यानंतर पाकिस्ताचे खेळाडू शोएब मलिक, वहाब रियाझ आणि इमाम-उल-हक यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यात हे खेळाडू एका क्लबमध्ये मेजवानी करताना दिसत होते. हा फोटो भारत-पाकिस्तान सामन्याआधीच्या रात्रीचा आहे, अशीही चर्चा सुरु होती.

मात्र, तो फोटो सामन्याच्या दोन दिवस आधीचा होता असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले होते. या फोटोमध्ये मलिकची पत्नी आणि भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाही होती. त्यामुळे तिच्यावरही टीका करण्यात आली. मात्र, सानियावरील टीका निरर्थक आहे, असे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरला वाटते.

- Advertisement -

सानिया खूपच दुर्दैवी आहे. तिने काहीही केले तरी तिच्यावर कधी भारतीय लोकांकडून आणि कधी पाकिस्तानी लोकांकडून टीका होते. तिच्यावर होणारी टीका निरर्थक आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. पाकिस्तानचा संघ पराभूत झाला तर तिला लक्ष्य केले जाते, कारण तिचा पती पाकिस्तानसाठी खेळतो. जर ती पतीसोबत जेवायला किंवा नुसती फिरायला गेली, तर त्यात तिचे काय चुकले? तिने काय गुन्हा केला का? कोणत्याही खेळाडूने वैयक्तिक आयुष्यात काय करावे हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला.

फक्त तुमचे ट्विटर अकाउंट आहे म्हणून तुम्ही दुसर्‍यांच्या कुटुंबाविषयी बोलू शकत नाही. सानिया फक्त पतीसोबत जेवायला गेली होती. तिच्यासोबत बाहेर गेल्यामुळे मलिकची कामगिरी खालावली असे म्हणणे खरंच योग्य आहे का? जरी दुसर्‍या दिवशी सामना असला, तरी खेळाडूंना रात्री १२ वाजेपर्यंत बाहेर राहण्याची परवानगी असते. त्यामुळे घडणार्‍या प्रकाराबद्दल मला खूप वाईट वाटते, असे अख्तर म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -