पॅटिन्सनला विश्रांती, हेझलवूडला संधी?

दुसरा अ‍ॅशेस कसोटी सामना

Mumbai
पॅटिन्सन,हेझलवूड

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांमधील प्रतिष्ठेच्या अ‍ॅशेस मालिकेतील दुसर्‍या कसोटी सामन्याला बुधवारपासून क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या लॉर्ड्सवर सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियाने पहिला सामना २५१ धावांनी जिंकला. त्यामुळे दुसर्‍या सामन्यासाठी त्यांच्या संघात बदल होणार नाही, अशी अपेक्षा होती. मात्र, वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सनला विश्रांती देण्याचा ऑस्ट्रेलियाच्या संघ व्यवस्थापनाने निर्णय घेतला आहे. त्याच्या जागी मध्यम गती गोलंदाज जॉश हेझलवूडची निवड होण्याची दाट शक्यता आहे.

हेझलवूड आणि विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या मिचेल स्टार्कला अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत संधी मिळाली नव्हती. मात्र, ऑस्ट्रेलियाने दुसर्‍या कसोटीसाठी मंगळवारी जाहीर केलेल्या १२ सदस्यीय संघात या दोघांचाही समावेश होता. तब्बल तीन वर्षांनंतर कसोटी संघात पुनरागमन करणार्‍या पॅटिन्सनने पहिल्या कसोटीत २ गडी बाद केले आणि फलंदाजीत नाबाद ४७ धावांची खेळी केली होती.

दुसर्‍या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघ (१२ सदस्यीय) : टीम पेन (कर्णधार/यष्टीरक्षक), डेविड वॉर्नर, कॅमरून बँक्रॉफ्ट, उस्मान ख्वाजा, स्टिव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, पीटर सीडेल, नेथन लायन, जॉश हेझलवूड.