शमी होऊ शकेल रिव्हर्स-स्विंगचा बादशाह!

Mumbai
akthar
शोएब अख्तरचे मत

भारताने नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा २०३ धावांनी पराभव करत ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. भारताच्या या विजयात पहिल्यांदा सलामीवीर म्हणून खेळणारा रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. रोहितने या सामन्याच्या दोन्ही डावांत शतके (१७६ आणि १२७) लगावत सामनावीराचा पुरस्कार मिळवला. दुसरीकडे पहिल्या डावात एकही विकेट न मिळवणार्‍या शमीने दुसर्‍या डावात रिव्हर्स-स्विंगचा उत्कृष्ट वापर करत द.आफ्रिकेच्या ५ फलंदाजांना माघारी पाठवले. या कामगिरीमुळे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने या दोघांचे कौतुक केले.

इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकातील भारताच्या निराशाजनक पराभवानंतर शमीने मला फोन केला होता. भारतीय संघ विश्वचषकात चांगली कामगिरी करू शकला नाही, याचे त्याला दुःख होते. मात्र, मी त्याला निराश नको होऊ आणि फिटनेसवर मेहनत घेत राहा, असा सल्ला दिला. तसेच आता तुमची घरच्या मैदानावर मालिका होणार असून त्यात तू दमदार कामगिरी करशील असा मला विश्वास आहे,असे मी शमीला म्हणालो.

मी त्याला सांगितले की, तू वेगाने गोलंदाजी कर आणि फलंदाजांना माघारी पाठवत राहा. तो चेंडू सीम आणि स्विंग करू शकतो. तो रिव्हर्स-स्विंगचा उत्कृष्ट वापर करतो, जे आशियातील फारशा गोलंदाजांना जमत नाही. तू रिव्हर्स-स्विंगचा बादशाह होऊ शकतोस, असे मी शमीला म्हणालो. त्याने पहिल्या कसोटीत जी कामगिरी केली, त्याने मी खुश आहे, असे अख्तर म्हणाला.

सलामीवीर रोहितविषयी अख्तरने सांगितले, रोहित शर्मा शतकांमागे शतके करत आहे. भारतीय संघाने रोहितला कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने संधी दिली पाहिजे, हे मी आधीपासूनच सांगत होतो. आता तो कसोटीतही उत्कृष्ट फलंदाज म्हणून समोर येईल असा मला विश्वास आहे.

पाकचे गोलंदाज मदत मागतच नाहीत!
मोहम्मद शमीसारखे परदेशातील गोलंदाज सल्ला मागत असताना पाकिस्तानचे गोलंदाज अजूनही मदत मागत नाही, याची शोएब अख्तरला खंत आहे. पाकिस्तानचे गोलंदाज कामगिरी सुधारण्यासाठी माझ्याकडे मदत मागत नाहीत ही निराशाजनक गोष्ट आहे. मात्र, शमीसारखे गोलंदाज माझ्याकडे सल्ला मागतात याचा आनंदही आहे, असे अख्तरने सांगितले. तसेच भारताचा कर्णधार विराट कोहली हा गोलंदाजांना प्रोत्साहन देणारा कर्णधार आहे, अशी स्तुती अख्तरने केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here