शिवशंकर मंडळाने पटकावला ‘बंड्या मारुती चषक’

Mumbai
शिवशंकर मंडळ विजेते

बंड्या मारुती क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे ठाणे-कल्याणच्या शिवशंकर क्रीडा मंडळाने जेतेपद पटकावले. त्यामुळे त्यांनी रोख रु. 51 हजार आणि बंड्या मारुती चषक आपल्या नावे केला. उपविजेत्या विजय क्लबला चषक आणि रोख रु. 35 हजारांवर समाधान मानावे लागले. शिवशंकर मंडळाचा गणेश जाधव या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला.

ना. म. जोशी मार्ग येथील ललित क्रीडा केंद्राच्या प्रांगणावर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शिवशंकर मंडळाने विजय क्लबचा कडवा प्रतिकार २८-२० असा मोडीत काढत स्पर्धेचे जेतेपद पटकावले. या सामन्याची दोन्ही संघांनी सावध सुरुवात केली होती. त्यामुळे मध्यंतरापर्यंत या सामन्यात १०-१० अशी बरोबरी होती. मध्यंतरानंतर मात्र सामन्यात खरी चुरस पहावयास मिळाली. शिवशंकर मंडळाचे प्रो-कबड्डी स्टार श्रीकांत जाधव, निलेश साळुंखे यांनी आपला खेळ उंचावला आणि चढाईत गुण घेण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर अनुभवी सूरज बनसोडे, तुषार भोईर यांनी आक्रमक पकडी करत विजय क्लबवर पहिला लोण चढवला. सामन्यातील हा एकमेव लोण होता. शिवशंकरने पुढेही चांगला खेळ सुरू ठेवत हा सामना जिंकला. विजय दिवेकरचा अष्टपैलू खेळ,अमित चव्हाणच्या चढाया आणि सुनील पाटीलच्या पकडी विजय क्लबला सामना जिंकवून देऊ शकल्या नाहीत.

त्याआधी झालेल्या उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात शिवशंकरने जय भारतला ४१-२० असे नमविले होते, तर दुसर्‍या सामन्याचा निकाल मात्र सुवर्ण चढाईवर लागला. त्यात विजय क्लबने २२-२२ आणि ५-५ चढायांच्या डावात २७-२७(५-५) अशा बरोबरीनंतर स्वस्तिक मंडळावर बाजी मारली. विजय क्लबच्या विजय दिवेकरने सुवर्ण चढाईत गडी टिपत संघाला अंतिम फेरीत नेले.

या स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईचे पारितोषिक विजय क्लबच्या अमित चव्हाणला, तर उत्कृष्ट पकडीचे पारितोषिक विजय क्लबच्याच विजय दिवेकरला मिळाले. या दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी सायकल देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here