घरक्रीडाकसोटीसाठी नवा विचार करण्याची वेळ?

कसोटीसाठी नवा विचार करण्याची वेळ?

Subscribe

मेलबर्न कसोटीत अजिंक्यने कर्णधार म्हणून विजयांची हॅटट्रिक साजरी केली. त्यामुळे आता कोहलीच्या जागी अजिंक्यलाच भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवली पाहिजे असे मत काहींनी व्यक्त केले. भारताचे नेतृत्व कोहलीपेक्षा रहाणे चांगल्या पद्धतीने करू शकतो असेही आता काहींना वाटत आहे. परंतु, केवळ तीन विजयांनंतर या निष्कर्षावर पोहोचणे योग्य आहे का?       

‘भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवण्याचा दबाव नसतो असे कोणी म्हणत असेल, तर ते योग्य ठरणार नाही. प्रत्येक मालिका महत्वाची असते, प्रत्येक सामना महत्वाचा असतो. त्यामुळे कर्णधारावर दडपण हे असतेच. मात्र, तुम्ही हे दडपण कसे हाताळता आणि कशी कामगिरी करता हे सर्वात महत्वाचे असते. कर्णधारपदाच्या दबावाचा अजिंक्यच्या फलंदाजीवर परिणाम होईल असे मला वाटत नाही,’ असे मेलबर्न कसोटीपूर्वी भारताचे माजी क्रिकेटपटू आणि अजिंक्य रहाणेचे प्रशिक्षक प्रवीण आमरे ‘आपलं महानगर’शी बोलताना म्हणाले होते. आमरे यांनी केलेले हे भाकीत खरे ठरले. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटीत भारताचे नेतृत्व केले आणि त्याच्या शतकी खेळीमुळे भारताने अविस्मरणीय विजय मिळवला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. भारताने २०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पहिल्यांदा कसोटी मालिकेत धूळ चारण्याचा पराक्रम केला होता. त्यामुळे यंदाच्या मालिकेतही भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला झुंज देईल अशी अपेक्षा होते. पहिल्या कसोटीत मात्र भारताला अपेक्षित खेळ करता आला नाही. अ‍ॅडलेडमध्ये भारताने पहिल्यांदा परदेशात डे-नाईट कसोटी सामना खेळला. या कसोटीच्या पहिल्या डावात भारताने आघाडी मिळवली. दुसऱ्या डावात मात्र जे घडले, त्याची कोणत्याही क्रिकेट रसिकाने किंवा समीक्षकाने अपेक्षा केली नव्हती. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा दुसरा डाव ३६ धावांतच आटोपला. भारताचा धावसंख्येच्या बाबतीत हा नीचांक ठरला आणि भारताने हा सामना गमावला.

- Advertisement -

अखेरच्या तीन कसोटीत कर्णधार विराट कोहली खेळणार नसल्याने पिछाडीवर पडलेला भारताचा संघ या मालिकेत पुनरागमन करेल असे कोणालाही वाटत नव्हते. मात्र, मुंबईकर अजिंक्य रहाणेने ज्याप्रकारे भारताच्या खेळाडूंना आत्मविश्वास दिला, त्यासाठी त्याचे कौतुक करावे तितके कमीच! अजिंक्यच्या नेतृत्वात भारताने मेलबर्न कसोटीत ८ विकेट राखून बाजी मारत चार सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. पहिल्या डावात भारतीय संघ अडचणीत असताना अजिंक्यने ११२ धावांची खेळी करत भारताला केवळ सावरले नाही, तर त्यांना शतकी आघाडी मिळवून दिली. त्यामुळे अजिंक्यलाच सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

परदेशात भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची ही अजिंक्यची पहिलीच वेळ होती. याआधी त्याने दोन वेळा भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवले होते आणि भारतात झालेले हे दोन्ही सामने जिंकण्यात टीम इंडियाला यश आले होते. मेलबर्न कसोटीत अजिंक्यने विजयांची हॅटट्रिक साजरी केली. त्यामुळे आता कोहलीच्या जागी अजिंक्यलाच भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवली पाहिजे असे मत काहींनी व्यक्त केले. भारताचे नेतृत्व कोहलीपेक्षा रहाणे चांगल्या पद्धतीने करू शकतो असेही आता काहींना वाटत आहे. परंतु, केवळ तीन विजयांनंतर या निष्कर्षावर पोहोचणे योग्य आहे का?

- Advertisement -

कोहली हा सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज! नुकताच त्याला दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला. फलंदाज म्हणून कोहली ‘मॅचविनर’ आहे, याबाबत कोणाच्याही मनात शंका नाही. मात्र, कर्णधार म्हणून कोहलीबाबत अजूनही काही प्रश्नचिन्ह आहे. भारताला मन्सूर अली खान पतौडी, अजित वाडेकर, कपिल देव, अझरुद्दीन, सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी यांसारखे उत्कृष्ट कर्णधार लाभले. मात्र, या सर्वांना मागे टाकत कोहली कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला. कोहलीने भारताचा कर्णधार म्हणून ५६ पैकी ३३ कसोटी सामने जिंकले असून ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम भारताने कोहलीच्याच नेतृत्वात केला. तसेच मागील काही वर्षांत भारताने इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिजमध्ये कसोटी सामने जिंकले आहेत.

कोहलीला कर्णधार म्हणून आयसीसीची स्पर्धा जिंकता आलेली नाही. तसेच कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ अजून एकदाही आयपीएलचा विजेता ठरलेला नाही. मात्र, असे असले तरी त्याच्या नेतृत्वात भारताने कसोटीत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे, हेसुद्धा तितकेच खरे! कोहली संघात नसताना अजिंक्यने भारताचे कर्णधारपद सक्षमपणे भूषवले आहे. मात्र, आयपीएल आणि आयसीसीच्या स्पर्धांमधील निकालांच्या आधारावर कोहलीला कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून हटवणे योग्य ठरणार नाही, हे निश्चित.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -