कर्णधार म्हणून रोहित, धोनीत साम्य!

सुरेश रैनाचे मत

Mumbai

भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. तसेच कर्णधार म्हणून त्याने आयपीएल स्पर्धेत बरेच यश मिळवले आहे. त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने सर्वाधिक चार वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. त्यामुळे विराट कोहलीवरील ताण कमी करण्यासाठी रोहितची भारताच्या एकदिवसीय आणि टी-२० संघाच्या कर्णधारपदी निवड झाली पाहिजे असे अनेकांना वाटते. रोहित आंतरराष्ट्रीय कर्णधार म्हणूनही यशस्वी होईल असे भारताचा फलंदाज सुरेश रैनाला वाटते. तसेच कर्णधार म्हणून त्याच्यात आणि महेंद्रसिंग धोनीमध्ये बरेच साम्य आहे असे रैनाने नमूद केले.

रोहितची नेतृत्व करण्याची पद्धत धोनीसारखीच आहे. तो खूप शांत आणि संयमी आहे. तो इतर खेळाडूंना प्रोत्साहन देतो. तो निडर आहे. कोणत्याही परिस्थितीत धावा करण्याचा त्याच्यात विश्वास आहे. त्याच्यातील विश्वास पाहून इतरांमध्येही आत्मविश्वास निर्माण होतो. त्याची हीच गोष्ट मला खूप आवडते. त्याला बाहेरुन सल्ले मिळत असतील, पण बरेच निर्णय तो स्वतः मैदानात घेतो. त्यामुळेच कर्णधार म्हणून त्याने इतके यश मिळवले आहे, असे रैनाने सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here