घरक्रीडाकरोनाचा धोका पत्करून सिंधू ऑल इंग्लंड स्पर्धेत खेळत राहिली!

करोनाचा धोका पत्करून सिंधू ऑल इंग्लंड स्पर्धेत खेळत राहिली!

Subscribe

वडील पी. व्ही. रामणा यांची माहिती

करोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील जवळपास सर्व स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत किंवा मागे घेण्यात आल्या आहेत. परंतु, असे असतानाही मागील आठवड्यात ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा खेळवण्यात आली. त्यामुळे जागतिक बॅडमिंटन फेडरेशनवर (बीडब्ल्यूएफ) बरीच टीकाही झाली. या स्पर्धेत भारताचे बरेच खेळाडू सहभागी झाले होते, ज्यात विश्वविजेत्या पी. व्ही. सिंधूचाही समावेश होता. करोनाचा धोका लक्षात घेऊन भारत सरकारने प्रवासावर निर्बंध घातले.

त्यांनी परदेशी नागरिकांना १५ एप्रिलपर्यंत व्हिसा देणार नसल्याची घोषणा केली. तसेच परदेशातून परतणार्‍या भारतीयांना १४ दिवस विलगीकरणात राहावे लागेल असेही सांगितले. त्यानंतर सिंधूला ऑल इंग्लंड स्पर्धेतून माघार घेण्याबाबत विचारणा करण्यात आली. मात्र, तिने खेळत राहण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

११ मार्चला मध्यरात्रीपासून प्रवासावर निर्बंध घालण्यात आले. पुढच्याच दिवशी गोपी (राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद) यांनी आम्हाला याबाबत सांगितले आणि आपण सामना न खेळता मायदेशी परत जायचे का? असे विचारले. केवळ सिंधू, लक्ष्य सेन, सिक्की रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांनाच ऑल इंग्लंड स्पर्धेची दुसरी फेरी गाठता आली होती. आम्ही तिथेच थांबून स्पर्धेत खेळत राहण्याचा निर्णय घेतला. विमल कुमार यांनीही यासाठी होकार दिला. आता आपण इथे आलो आहोत आणि आणखी एक दिवस इथे राहिल्यास काय मोठा फरक पडणार आहे, असा आम्ही विचार केला, असे सिंधूचे वडील पी. व्ही. रामणा म्हणाले.

लक्ष्य सेन दुसर्‍या फेरीत पराभूत झाला, तर सिंधूने उपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र, या फेरीत तिचा जपानच्या नोझोमी ओकुहाराने पराभव केला. इंग्लंडमधील अनुभवाबाबत रामणा यांनी सांगितले, इंग्लंडमध्ये आम्ही जेव्हा हॉटेलमध्ये होतो किंवा प्रवास करत होतो, तेव्हा कोणीही मास्क घातले नव्हते. आम्ही मात्र खबरदारी घेतली. थंड वातावरणामुळे सर्दी होईल अशी आम्हाला भीती होती. त्यामुळे आम्ही श्वसनाचे काही व्यायाम केले, तसेच तुळशीची पाने घालून गरम पाणी प्यायलो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -