घरक्रीडाकोहली नाही स्मिथ, टेस्टमध्ये बेस्ट!

कोहली नाही स्मिथ, टेस्टमध्ये बेस्ट!

Subscribe

शेन वॉर्नचे मत

ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज स्टिव्ह स्मिथने सध्या सुरू असलेल्या अ‍ॅशेस मालिकेत अफलातून कामगिरी केली आहे. या मालिकेतील चार डावांमध्ये स्मिथने तीन शतके झळकावली आहेत. मागील वर्षी मार्चमध्ये बॉल टॅम्परिंग प्रकरणातील सहभागामुळे स्मिथवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती. मात्र, त्याने पुनरागमनात १४७.२५ च्या सरासरीने तब्ब्ल ५८९ धावा फटकावत आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत भारताच्या विराट कोहलीला मागे टाकत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. त्यामुळे सध्या कोहली आणि स्मिथ यांच्यापैकी सर्वोत्तम फलंदाज कोण, याविषयी बरीच चर्चा होत आहे. ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्नने कसोटी क्रिकेटमध्ये स्मिथला पसंती दर्शवली आहे. मात्र, क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये (कसोटी, एकदिवसीय, टी-२०) मिळून कोहली सर्वोत्तम फलंदाज आहे, असे वॉर्नला वाटते.

कसोटी क्रिकेटमध्ये कोहली आणि स्मिथपैकी सर्वोत्तम फलंदाज कोण, हे सांगणे अवघड आहे. मात्र, कसोटीत मला केवळ एका फलंदाजांची निवड करायची असल्यास मी नक्कीच स्मिथचे नाव घेईन. स्मिथ नसेल तर मला कोहलीची निवड करायला आवडेल. कोहली हा महान खेळाडू आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये मिळून कोहली हा सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. व्हिव रिचर्ड्स हे एकदिवसीय क्रिकेटमध्ये मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले सर्वोत्तम फलंदाज होते. मात्र, आता व्हिवची जागा कोहलीने घेतली आहे. कोहली हा एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फलंदाज आहे, असे वॉर्न म्हणाला.

- Advertisement -

फलंदाज म्हणून कोहलीची कामगिरी सर्वांनाच माहीत आहे. परंतु, तो तितकाच उत्कृष्ट कर्णधार आहे, असे वॉर्नला वाटते. कोहली हा उत्कृष्ट कर्णधार आहे. तुमच्यावर जेव्हा पहिल्यांदा कर्णधारपदाची जबाबदारी येते, तेव्हा तुम्ही सर्वोत्तम कामगिरी करत नाही. तुमच्यात सुधारणा होण्यासाठी थोडा वेळ लागतो. कोहली आता कर्णधार म्हणून परिपक्व झाला आहे. तो पूर्वी जरा जास्तच भावनिक होता. मात्र, आता तो बराच संयमी झाला आहे.

कोहली तोडणार सचिनचे विक्रम!

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ६८ शतके लगावली आहेत. तो अवघा ३० वर्षांचा आहे. त्यामुळे तो सचिन तेंडुलकरचा १०० शतकांचा विक्रम तोडेल, असे शेन वॉर्नला वाटते. याबाबत वॉर्न म्हणाला,सचिनचे सर्व विक्रम धोक्यात आहेत. मी कसोटीत ७०८ विकेट्स मिळवल्या आहेत. मला जर कोणी विचारले की, नेथन लायन माझा विक्रम मोडू शकेल का, तर मी कदाचित हो म्हणीन. इतक्या विकेट घेण्यासाठी त्याला बराच काळ चांगले क्रिकेट खेळावे लागेल. तुम्ही जर सचिनला विचारले की, तुला कोहलीने तुझे विक्रम तोडलेले आवडेल का, तर तोसुद्धा हो म्हणेल. कोहली सचिनचे विक्रम तोडेल असे मला नक्कीच वाटते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -