स्मिथ, वॉर्नर असल्यास ऑस्ट्रेलियाही जिंकू शकेल विश्वचषक!

Mumbai
नवा सहाय्यक प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगचे मत

मागील वर्षी मार्चमध्ये द. आफ्रिकेविरुद्ध केप टाऊन येथे झालेल्या कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंग प्रकरणातील सहभागामुळे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. त्यांच्यावरील बंदीचा कालावधी २९ मार्चला संपणार आहे. या दोन प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाला चांगले प्रदर्शन करता आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या बंदीचा कालावधी संपताच त्यांची संघात निवड होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाचा नवा सहाय्यक प्रशिक्षक आणि माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या मते जर हे दोघे संघात परतले तर गतविजेता ऑस्ट्रेलियाही नक्कीच यावर्षी इंग्लंडमध्ये होणारा विश्वचषक जिंकू शकेल.

मला असे नक्कीच वाटते की, ऑस्ट्रेलिया हा विश्वचषक जिंकू शकेल. सध्या इंग्लंड आणि भारत हे दोन संघ हा विश्वचषक जिंकण्याचे प्रमुख दावेदार आहेत. मात्र, जर ऑस्ट्रेलिया संघात स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नरचे पुनरागमन झाले तर आमचा संघही विश्वचषक जिंकण्याचा दावेदार होईल. स्मिथ, वॉर्नर आणि कॅमरून बॅन्क्रॉफ्टचेही मी नाव घेईन. या तिघांमुळे आमचा संघ खूप मजबूत होईल. ते जर असतील तर आमच्या संघात अनुभवी आणि युवा अशा दोन्ही प्रकारच्या खेळाडूंचे चांगले मिश्रण असेल. तसेच मला असेही वाटते की इंग्लंडमधील खेळपट्ट्या आमच्या संघाला अनुकूल असतील. मी याआधी विश्वचषक जिंकलेल्या संघांचा भाग होतो, त्यामुळे मला आशा आहे की, मी संघासोबत असल्याचाही ऑस्ट्रेलियाला फायदा होईल, असे पॉन्टिंग म्हणाला.

यावर्षी मे महिन्यात इंग्लंडमध्ये विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. २०१५ मध्ये आपल्या घरात झालेला विश्वचषक जिंकणार्‍या ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना ६ जून रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहे.

ऑस्ट्रेलियाला त्या दोघांची कमी जाणवते आहे – मार्क टेलर

स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नरच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियन फलंदाजांचे प्रदर्शन निराशाजनक आहे. त्यामुळे गोलंदाजांनी चांगली कामगिरी करूनही त्यांना काही सामने गमवावे लागले आहेत. ऑस्ट्रेलियाला स्मिथ आणि वॉर्नरची कमी जाणवते आहे, असे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलर म्हणाला. ऑस्ट्रेलियन फलंदाज ५०-६० धावा केल्यावर संतुष्ट होतात. पूर्वी त्यांना तसे करून चालत होते. स्मिथ आणि वॉर्नर प्रमुख फलंदाज म्हणून जबाबदारी पार पाडत होते, तर इतर फलंदाज त्यांच्या भोवती खेळायचे. आता हे दोघे नसल्याने इतरांवर अधिक जबाबदारी आली आहे आणि त्याचा दबाव त्यांना जाणवत आहे. या दोघांची कमी ऑस्ट्रेलियन संघाला आणि खासकरून फलंदाजांना जाणवत आहे, असे टेलर म्हणाला.

या दोघांच्या पुनरागमनाची चर्चा नाही !

स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नरच्या पुनरागमनाची बाहेर चर्चा होत असली तरी आम्ही याबाबत ड्रेसिंग रूममध्ये चर्चा करत नाही, असे ऑस्ट्रेलियन एकदिवसीय संघाचा उपकर्णधार अ‍ॅलेक्स कॅरी म्हणाला. आम्ही ड्रेसिंग रूममध्ये स्मिथ आणि वॉर्नरच्या पुनरागमनाची चर्चा करत नाही. आमचे लक्ष स्वतःची कामगिरी सुधारण्यावर आहे. आमच्या संघातील प्रत्येक खेळाडूला स्वतःचे स्थान टिकवायचे आहे. जर आम्ही चांगले प्रदर्शन केले तर त्या दोघांना पुनरागमन करणे कठीण होईल, असे कॅरी म्हणाला.