घरक्रीडादक्षिण आफ्रिकन क्रिकेटला गरज बदलांची!

दक्षिण आफ्रिकन क्रिकेटला गरज बदलांची!

Subscribe

क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या लॉर्ड्सवर पाकिस्तानविरुद्ध पराभूत झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ वर्ल्डकपची उपांत्य फेरी गाठणार नाही हे निश्चित झाले. फाफ डू प्लेसिसचा हा संघ वर्ल्डकप जिंकण्याचा प्रमुख दावेदार नव्हता हे खरे असले तरी हा संघ इतकी वाईट कामगिरी करेल, अशी कोणालाही अपेक्षा नव्हती. दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेत ७ सामन्यांपैकी ५ सामने गमावले असून, त्यांना केवळ १ (अफगाणिस्तान) सामना जिंकण्यात यश आले. मात्र, आता त्यांना वर्ल्डकपमधील निराशा सोडून पुढे जाण्याची गरज आहे, पण दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्ड आर्थिकदृष्ठ्या असक्षम असल्यामुळे सध्या तरी या संघाचे भविष्य अंधारात आहे.

दक्षिण आफ्रिकेचा संघ या वर्ल्डकपसाठी पूर्णपणे तयार असावा म्हणून आम्ही विविध खेळाडूंना पुढील काही महिने संधी देणार आहोत, असे २०१८च्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेच्या निवड समितीचे संयोजक लिंडा झोण्डी म्हणाले होते. त्यानंतर काही युवा, प्रतिभावान खेळाडूंना संधी देण्यात आली होती. मात्र, त्यांना या संधीचे सोने करण्यात अपयश आल्याने वर्ल्डकपसाठी दक्षिण आफ्रिकन निवड समितीला पुन्हा हाशिम आमला, जेपी ड्युमिनी, डेल स्टेन यांसारख्या अनुभवी खेळाडूंकडे वळावे लागले. स्टेनला दुखापतीमुळे या स्पर्धेत एकही सामना खेळता आला नाही, तर आमला आणि ड्युमिनी यांचे प्रदर्शन अत्यंत निराशाजनक आहे.

- Advertisement -

दक्षिण आफ्रिकन संघाच्या या दुरवस्थेला क्रिकेट बोर्ड आणि निवड समितीला दोष देणे योग्य आहे का? कदाचित हो. सध्या दक्षिण आफ्रिकेच्या स्थानिक क्रिकेटमध्ये प्रतिभावान खेळाडूंचा दुष्काळ आहे. याचे प्रमुख कारण आहे, त्यांच्या बर्‍याच ‘गोर्‍या’ खेळाडूंनी इंग्लंडमधील कौंटी संघांशी केलेला कोलपॅक करार. या करारामुळे ते राष्ट्रीय संघासाठी खेळू शकत नाहीत. तसेच इंग्लंडमधील मोसम संपत नाही, तोपर्यंत हे खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या स्थानिक क्रिकेटमध्येही खेळू शकत नाहीत. कोलपॅक करार करणार्‍या खेळाडूंमध्ये गोलंदाज काऐल अ‍ॅबॉट, डुवान ऑलिव्हर, अष्टपैलू डेविड विसा, फलंदाज रायली रुसो, स्टियन वॅन झील, कॉलिन इंग्राम यांचा समावेश आहे. खासकरून अ‍ॅबॉट आणि ऑलिव्हर यांची उणीव दक्षिण आफ्रिकेला प्रकर्षाने जाणवत आहे. ऑलिव्हरने यावर्षीच्या सुरुवातीला यॉर्कशायरशी करार केला होता. हा करार करण्याआधी ५ कसोटी सामन्यांत त्याने ३१ विकेट्स पटकावल्या होत्या. त्यामुळे त्याने कोलपॅक करार केल्याने दक्षिण आफ्रिकन बोर्डाला धक्का बसला.

हे खेळाडू राष्ट्रीय संघासाठी खेळण्यापेक्षा कौंटी क्रिकेट खेळण्याला का पसंती का देतात हा खरा प्रश्न आहे. दक्षिण आफ्रिकन क्रिकेटमध्ये कोटा सिस्टम आहे. त्यानुसार स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय संघात केवळ ५ ‘गोरे’ खेळाडू एकावेळी खेळू शकतात. त्यामुळे जर एखाद्या खेळाडूचे प्रदर्शन खालावले, तर त्याचे संघातील स्थान जाण्याचा धोका असतो. तसेच कौंटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या स्थानिक क्रिकेटपेक्षा कितीतरी पटीने जास्त पैसा मिळतो. त्यामुळे आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी हे खेळाडू कोलपॅक करार करण्याला पसंती देतात. मात्र, आता या अडचणी असतानाही हा संघ प्रगती करू शकतो का?

- Advertisement -

दक्षिण आफ्रिकन क्रिकेटला पुढे जाण्यासाठी आपल्याकडे असलेल्या खेळाडूंचा योग्यप्रकारे वापर करणे गरजेचे आहे. सध्याच्या संघात बरेच वयस्कर खेळाडू आहेत. पुढील वर्ल्डकप लक्षात ठेऊन त्यांनी या खेळाडूंना संघातून वगळण्याचे धाडस दाखवून युवा खेळाडूंना संधी देणे गरजेचे आहे. त्यांच्यासमोर इंग्लंडचे उदाहरण आहे. इंग्लंडने मागील वर्ल्डकपमध्ये (२०१५) खराब कामगिरी केल्यानंतर नवीन युवा संघ बांधला. तसेच त्यांनी सकारात्मक आणि आक्रमक पद्धतीने खेळण्यास सुरुवात केली. त्यामुळे हा संघ सध्याच्या घडीला एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ म्हणून ओळखला जातो. दक्षिण आफ्रिकेनेही संघात योग्य बदल केल्यास हा संघ पुन्हा एकदा जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक होऊ शकेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -